PM Kisan Yojana: आनंदवार्ता! पीएम किसानचा 24 वा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार, सरकारने तारीख केली जाहीर
PM Kisan Yojana 24th installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने याविषयीची तारीखच आता जाहीर केली आहे. दिवाळीत शेतकऱ्यांच्या हाती थोडा पैसा येणार आहे.

PM Kisan Yojana 24th installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्त्याविषयी अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात येईल. 20 जून 2026 रोजी सरकारने 23 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होईल. भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधार कार्डशी जोडणे आणि ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना 24 वा हप्ता प्राप्त होईल. त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतील. दरवर्षी केंद्र सरकार पीएम किसान योजनेतंर्गत तीन हप्त्यात 6 हजार रुपये जमा करते. यातंर्गत 89.48 लाख शेतकऱ्यांना 1 हजार 796 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी सुद्धा गरजेची
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, तुमच्या मोबाईल क्रमाकांशी संलग्नित
जमिनीचा 7/12 उतारा, 8-अ
बँक पासबुक गरजेचे
तर दोन हजार रूपये जमा होणार नाहीत
ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसानचा नवीन हप्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच शेतजमिनीचा पडताळा, आधार लिकिंग आणि दस्तावेजातील नावातील चूक हे लागलीच दुरूस्त करणे आवश्यक आहे. या पाच दिवसात जर ही कामं केली नसतील तर ती पूर्ण केल्यास पीएम किसानचा हप्ता जमा होऊ शकतो.
