
गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्थिरता आहे. खासकरून इराण मोठ्या संकटात आहे. जून 2025 मध्ये या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे बंकरमध्ये लपले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा बंकरमध्ये लपल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर खमेनी यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या सात महिन्यांत अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी खमेनी दुसऱ्यांदा बंकरमध्ये लपले आहेत.
बीबीसी पर्शियनने दिलेल्या वृ्त्तानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कासिम सुलेमानी किंवा अबू बकर अल-बगदादी यांच्यासारखे खामेनींना मारण्याची धमकी दिली आहे. इराणने ही धमकी गांभीर्याने घेतली असून खामेनी यांना बंकरमध्ये पाठवले आहे. तसेच इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी घोषणा केली की, जर खमेनींवर हल्ला झाला तर इराण त्याला युद्धाची सुरुवात असे मानेल आणि प्रतिहल्ला करेल.
काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कराकस येथून उचलून नेले होते. ते सध्या अमेरिकेच्या तुरुंगात कैद आहेत. अमेरिकेने ड्रग्ज कार्टेल चालवत असल्याचा आरोप करत मादुरो यांना अटक केली आहे. अशीच भीती खामेनी यांना आहे. त्यामुळे ते तेहरानजवळील बंकरमध्ये लपून बसले असल्याची माहिती समोर आली आहे. जून 2025 मध्ये जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता तेव्हा खामेनी 21 दिवस बंकरमध्ये लपून बसले होते.
इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खामेनी 17 जानेवारी रोजी सार्वजनिकरित्या दिसले होते. खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण शक्ती आहे. ते देशाचे सर्व प्रमुख निर्णय घेतात. त्यामुळे अमेरिकेला इराणी सरकार उलथवायचे असेल तर खामेनींना पदावरून हटवणे आवश्यक आहे. त्यामुळे ते अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत.
खामेनी हे अमेरिकेचे कट्टर विरोधक मानले जातात. 2016 मध्ये इराणने अमेरिकेशी अणुकरार केला तेव्हा खमेनींनी त्याचा उघडपणे विरोध केला होता. जून 2025 मध्येही अमेरिकेने त्यांना मारण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता पु्न्हा एकदा त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेने इराणला वेढा घालण्यास सुरुवात केल्याचीही माहिती समोर आली आहे. यूएसएस अब्राहम मलाक्काच्या सामुद्रधुनीत तैनात करण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे.