Nepal Violence : नेपाळच्या अराजकाचा धूर भारतापर्यंत? पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट; नेमकं काय घडतंय?

तरुणांच्या उठावामुळे नेपाळमधील सरकार अस्थीर झाले आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. असे असतानाच आता नेपाळमधील परिस्थिती लक्षात घेऊन भारताने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे.

Nepal Violence : नेपाळच्या अराजकाचा धूर भारतापर्यंत? पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट; नेमकं काय घडतंय?
nepal protest and violence
| Updated on: Sep 09, 2025 | 4:37 PM

Nepal Protest And Violence : वाढता भ्रष्टाचार आणि सराकरने जवळपास सर्वच सोशल मीडियावर आणलेली बंदी यामुळे नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहे. या देशातील तरुणांनी राजधानी काठमांडू एका प्रकारे ताब्यात घेतली आहे. तिथे तरुण आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून मंत्र्‍यांची निवासस्थाने पेटवून देण्यात आली आहेत. तसेच संसदेलाही आग लावण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये तरुणांचा हा रोष आणि सुरू असलेली हिंसा यामुळे तेथील सरकारला पायउतार व्हावे लागले आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी राजीनामा दिला असून ते अज्ञात स्थळी निघून गेले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच या देशाचा शेजारी असलेल्या भारताने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य सध्या हायअलर्ट मोडवर असून संरक्षण यंत्रणांचा सीमाभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडत आहे?

पश्चिम बंगाल हे भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याची सीमा नेपाळ राज्याला लागून आहे. सध्या नेपाळमध्ये अशांतता आहे. तरुण आंदोलक दिसेल तिथे जाळपोळ करत आहेत. अनेक आंदोलकांचा मृत्यूही झाला आहे. अशा स्थितीत आता भारत-नेपाळच्या सीमेतून काही नेपाळी नागरिक सुरक्षेसाठी भारतात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेता आता भारतातील सुरक्षा यंत्रणा, लष्कर हायअलर्ट मोडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळ-पश्चिम बंगालच्या पानीटंकी या सीमेवर लष्कराने आपला बंदोबस्त वाढवला आहे.

नेपाळ-पश्चिम बंगालच्या सीमेवर काय स्थिती आहे?

पश्चिम बंगालमधील पोलीस अधिकारी प्रवीण प्रकाश यांनी पश्चिम बंगालमधील तयारीबाबत सविस्तर सांगितले आहे. पानीटंकी सीमेवर एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या भागात पोलिसांची एक तुकडीदेखील तैनात आहे, अशी माहिती प्रवीण प्रकाश यांनी दिली. तसेच आम्ही अलर्ट मोडवर आहोत. तसेच नेपाळमधील परिस्थितीवर आमची नजर आहे, असेही त्यांनी सांगितले.

लवकरच नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार

दरम्यान, सध्या नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेता ते अज्ञात स्थळी निघून गेले आहेत. सध्या नेपाळचा कारभार लष्कराकडे आहे. 9 सप्टेंबरच्या संध्याकाळी नव्या पंतप्रधानांची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा शांतता कधी प्रस्थापित होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.