AMCA Project : भारताची अशी कुठली मजबुरी अमेरिकन कंपनी GE ला कळलीय की त्यांनी इंजिनची किंमत थेट 70-80 कोटी वरुन 200 कोटी नेली
AMCA Project : अमेरिकन कंपनी GE ने 70 ते 80 कोटीमध्ये F414 इंजिन देण्याची तयारी दाखवलेली. पण आता त्यांनी थेट इंजिनची किंमत 200 कोटीच्या पुढे नेली आहे. यामुळे AMCA आणि तेजस MK2 हे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आले आहेत. अमेरिकन कंपनीला भारताची अशी कुठली मजबुरी समजलीय की, त्यांनी थेट इंजिनची किंमत इतकी वाढवली.

AMCA च्या माध्यमातून भारत पाचव्या पिढीचं स्टेल्थ फायटर विमान बनवतं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे भारताचं लक्ष्य आहे. पाचव्या पिढीचं फायटर जेट विकसित करताना आज भारतासमोर मुख्य चॅलेंज इंजिनचं आहे. एअरफ्रेम, रडार, एवियोनिक्स आणि शस्त्रास्त्र या क्षेत्रात प्रगती करुनही भारत आज इंजिनसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे. अमेरिकी एयरोस्पेस कंपनीने जनरल इलेक्ट्रिकने F414 इंजिनच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे AMCA आणि तेजस MK2 विमान निर्मितीचा खर्च वाढणार आहे. त्याशिवाय प्रकल्पाला आणखी विलंब होऊ शकतो. AMCA प्रोजेक्टसाठी GE सोबत सुरु असलेली चर्चा इंजिनच्या किंमतीवरुन रखडली आहे. DRDO च्या सूत्राच्या माहितीनुसार, F414 इंजिनची सुरुवातीची किंमत 70 ते 80 कोटी रुपये प्रति युनिट होती. पण आता GE ने या किंमतीती तिप्पट वाढ केली आहे. हेच इंजिन स्वदेशी विमान तेजस MK2 फायटर विमानात सुद्धा वापरलं जाणार आहे. त्यामुळे भारताच्या दोन प्रोजेक्टना फटका बसणार आहे.
एरोनॉटिकल डेवलपमेंट एजन्सीला पाच फ्लाइंग प्रोटोटाइपसाठी 15 F414 इंजिन्सची आवश्यकता आहे. विमानाचं डिजाइन याच इंजिनच्या अनुरुप बनवण्यात आलं आहे. म्हणून आता इंजिन बदलणं व्यवहार्य नाही. अन्यथा सर्व डिझाइन बदलावी लागेल. त्यामुळे प्रकल्पाला अजून काही वर्ष लागतील. पाचव्या पिढीच्या फायटर विमानांच्या प्रोटोटाइप विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंजिनची किंमत वाढल्याने सर्व प्रकल्पाचा खर्च वाढू शकतो. AMCA विमानं 2034-35 पर्यंत ताफ्यात समाविष्ट करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. प्रोटोटाइप विमान सात वर्षात 1800 टेस्ट सॉर्टी पूर्ण करेल. RFP नुसार निवडण्यात आलेल्या तीन कंपन्यांपैकी एकाशी कारर होईल. 30 महिन्याच्या आता प्रोटोटाइप बनवावं लागेल.
अजून किती देश इंजिनसाठी अमेरिकेवर अवलंबून
भारतचं नाही तुर्की आणि दक्षिण कोरिया हे देश सुद्धा पाचव्या पिढीचं फायटर विमान विकसित करत आहेत. ते सु्द्धा इंजिनसाठी अमेरिकेवरच अवलंबून आहेत. तुर्कीचं पाचव्या पिढीचं KAAN स्टेल्थ फायटर प्रारंभीच्या टप्प्यात GE F110 इंजिनसह उड्डाण करेल. दक्षिण कोरियाचं KF-21 Boramae स्टेल्थ जेट GE F414 इंजिनवरचं आकाशात झेप घेतय. लायसन्स अंतर्गत त्यांचं उत्पादन सुरु आहे. स्वीडनचं ग्रिपेन विमान सुद्धा GE F414G वर अवलंबून आहे. म्हणजे भारत एकटाच नाही, अनेक देश विमानाचा सुरुवातीचा टप्पा विकसित केल्यानतंर त्यांना अमेरिकेवर अवलंबून रहावं लागतय.