Pune MLC Election : पुण्याच्या निवडणुकीत कोणाचा ‘पॉवर’ गेम चालणार? महाविकास आघाडीनंतर भाजपच्या चव्हाणांनी कोणता डाव टाकला?
पुण्यात निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाविकास आघाडीनंतर आता महायुतीनेही कंबर कसली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीला काही प्रमाणात बंडखोरी रोखण्यात यश आलं आहे. भाजपला शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांचीही समजूत काढण्यासही यश आलं. त्यामुळे पुण्यातील भाजपच्या दोन उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासमोर आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं आव्हान असणार असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुण्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात महायुतमधील बंडखोरी शमवल्याचं बोललं जात आहे.
पुण्यात कोणाची खेळी चालणार?
पुण्याच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही जोरदार प्रयत्न केले आहेत. शरद पवार गटाचे पुण्यातील पदवीधरचे विद्यमान आमदार अरुण लाड हे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात होती. त्यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्याला देखील पाठ फिरवली होती. त्यानंतर शरद पवार गटाच्या पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आमदार अरुण लाड यांची भेट घेतली. या भेटीत देशमुख यांनी लाड यांना निवडणुकीत पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडीनंतर आता महायुतीनेही निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. पुणे शिक्षक , पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार दौरा केला. या दौऱ्यात भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं. या बैठकीत त्यांनी मतदार नोंदणी मोहिम तीव्र करणे, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवणे यांबाबतही महत्वाच्या सूचना केल्या.
जुनी पेन्शन समन्वय संघाशी बैठक
चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याबाबत निवेदन सादर केले. तर पुण्यातील कार्यकर्ता संमेलनात रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शरद लाड यांना प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आलं. या दोन दिवसीय दौऱ्यामुळे पुणे विभागातील निवडणूक तयारीला गती मिळाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.भाजपने जिल्हानिहाय संघटनात्मक समन्वय, बूथस्तरीय नियोजन आणि प्रचार यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर भर दिली.
चव्हाणांचा दावा काय?
पुण्यातील प्रचाराच्या शुभारंभावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले होते, पदवीधरसाठी स्मिता जाधव, शिक्षकसाठी कौस्तुभ गावडे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी फॉर्म काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जिंकण्यासाठी बैठका आणि आवश्यक असलेली कामे समन्वयक करत आहेत.जिंकण्यासाठी जे जे करावे लागेल ते करतील. महायुतीचे उमेदवार जिंकून येतील’.
