
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) भारताचा दबदबा बघायला मिळाला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतच पुढाकार घेऊन थेट ब्रिक्स देशांची बैठक घेतली. यासोबतच रशिया आणि भारत यांच्यातील खास मैत्री देखील जगाला बघायला मिळाले. रशियाने अमेरिकेच्या नाकावर टिच्चू भारताचे काैतुक करत म्हटले की, भारताने कोणासोबत भागीदारी करायची हे फक्त भारतच ठरवतो. एस. जयशंकर यांनी यादरम्यान पाकिस्तानचे थेट नाव न घेता मोठा टोला लगावत पाकिस्तानवर जोरदार टीका देखील केली. पाकिस्तानच्या दहशतवादावर त्यांनी भाष्य केले. स्वातंत्र्यापासून भारताला दहशतवादाचा मोठा धोका आहे, असे त्यांनी आपला भाषणात स्पष्ट म्हटले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य स्रोत त्याच देशाचा आहे. मुळात म्हणजे भारताला स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा मोठा धोका आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रतिनिधीने नाव घेऊन भारतावर थेट टीका केल्याचे बघायला मिळाले. मात्र, एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नव्हते. भारत हा पाकिस्तानला बदनाम करत असल्याचे पाकिस्तानच्या प्रतिनिधीने म्हटले.
यादरम्यान भारताने पाकिस्तानच्या आरोपांवर उत्तर देत म्हटले की, भारताने कोणाचेही नाव घेतले नाही. एक शेजारी देश सीमेपलीकडे दहशतवादाच्या आपल्या दीर्घकालीन पद्धतीची कबुली देत आहे हे यावरून स्पष्ट होतंय. भारताच्या स्थायी मिशनचे सचिव रेंटला श्रीनिवास यांनी म्हटले, पाकिस्तानची विश्वासार्हता बोलते आणि त्यांच्या दहशतवादाचा परिणाम शेजारील देशांवरच नाही तर जगभर होतो.
भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला. मागील काही दिवसांपासून भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला कोडींत पकडत आहे. पाकिस्तानसोबत वाढलेली अमेरिकेची जवळीकता आणि टॅरिफच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दाैरा रद्द केला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने पाकिस्तानविरोधात मोठा डाव टाकला आणि पाकिस्तान त्यात फसला. भारताने पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादावर टीका केली होती. मात्र, पाकिस्तान त्यामध्ये फसला आणि त्यांनी भारताला उत्तर दिल्याने त्यांचा बुरखा फाडला गेल्याचे बघायला मिळाले.