
गेल्या काही काळापासून इस्रायल हा देश सतत चर्चेत आहे. इस्रायलने इराणसोबत युद्ध लढले होते, त्यानंतरही अनेक देशांवर हल्ले केले होते. इस्रायलने अमेरिकेचा मित्र देश कतारवरही हल्ला केला होती. त्यानंतर अनेकांनी इस्रायल आता आगामी काळात तुर्कीवर हल्ला करणार असल्याचे भाकित केले होते. इस्रायली शैक्षणिक आणि राजकीय तज्ज्ञ मीर मसरी यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘आज कतार, उद्या तुर्की’ अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे आता इस्रायल तुर्कीवर हल्ल्याच्या तयारीत आहे, हे स्पष्ट होत आहे.
मीर मसरी यांच्या विधानानंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या सल्लागारानेही इस्रायलला इशारा दिला आहे. लवकरच इस्रायल नकाशावरून पुसला जाईल असं या सल्लागाराने म्हटलं आहे. यावर बोलताना अमेरिकन थिंक टँकचे तज्ज्ञ मायकेल रुबिन यांनी तुर्कीला सावध केलं आहे. त्यांनी म्हटलं की, तुर्कीने सुरक्षेसाठी नाटो किंवा अमेरिकेवर अवलंबून राहू नये. त्यानंतर आता तुर्कीने आम्ही आमच्या प्रादेशिक हितांचे रक्षण करू अशी भूमिका घेतली आहे.
तुर्की आणि इस्रायल यांच्यातील संबंध आधीच ताणले गेलेले आहेत. गाझा युद्धामुळे तुर्कीने इस्रायलसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. इस्रायल संपूर्ण मध्य पूर्वेतील देशांवर वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात असून इतर देशांना कमकुवत करत असल्याचा तुर्किचा आरोप आहे.याआधी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी असं म्हटलं होतं की, मी एका ग्रेटर इस्रायलची कल्पना करत आहे. यात सीरिया, लेबनॉन, इजिप्त आणि जॉर्डन या देशांच्या काही भागांचा समावेश करण्याची योजना आहे. मात्र तुर्की याला विरोध करत आहे.
तुर्की हा पहिला मुस्लिम देश होता ज्याने 1949 मध्ये इस्रायलला मान्यता दिली होती. मात्र तुर्की आणि इस्रायलचे संबंध कालांतराने बदलले आहेत. सुरुवातीला दोन्ही देशांमधील लष्करी आणि व्यापारी संबंध चांगले होते, मात्र 2010 मध्ये इस्रायलने मावी मारमारा जहाजावर हल्ला केला होता, त्यामुळे संबंध ताणले गेले. 2016 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती, काही क्षेत्रात सहकार्य वाढले, मात्र राजकीय तणाव कायम आहे. 2023 मध्ये इस्रायलने गाझावर हल्ला केल्याने पुन्हा दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.
तुर्कीमधील अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. इस्रायल आता फक्त गाझा किंवा लेबनॉनवर नव्हे तर ते सीरियामध्ये देखील हल्ले करत आहे. आगामी काळात इस्रायल तुर्कीविरुद्ध कारवाई करण्याची शक्यता आहे. एका निवृत्त तुर्की नौदल अधिकाऱ्याने म्हटले की, सायप्रससारख्या भागात इस्रायलची वाढती लष्करी ताकद तुर्कीसाठी धोका निर्माण करत आहे. दरम्यान याआधी इस्रायलने येमेन, सीरिया, ट्युनिशिया आणि इराणवरही हल्ला केला आहे.