
आज गुरूवार, 4 डिसेंबर… आजच्या श्रीदत्त जयंतीच्या दिवशीच अवकाशात एक अनोखं दृश्य दिसणार आहे. आज, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचे दर्शन होणार आहे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. हा या वर्षातील शेवटचा सुपरमून असून तो पाहण्याची शेवटची संधि आहे, त्यामुळे ही संधी खचितच दवडू नका. या सुपमूनाल कोल्ड मून असेही म्हटले जात आहे. आजचा चंद्र इतर दिवसांपेक्षा जास्त तेजस्वी आणि मोठा दिसेल, ज्याला कोल्ड मून असे नाव देण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की, खरंतर चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार कि.मीटर अंतरावर असतो. मात्र आजच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून 3 लक्ष 56 हजार 962 किलोमीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे आजच्या रात्री चंद्रबिंब हे 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणा सर्वांनाच सुपरमूनचे दर्शन घेता येणार आहे. आज, 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी पूर्वेस सुपरमून उगवेल आणि रात्रभर आपलया सर्वांना दर्शन देऊन उद्या सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी चंद्र पश्चिम दिशेस मावळेल. यानंतर पुन्हा सुपरमून दर्शनाचा योग पुढल्यावर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार असल्याचे श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
कोल्ड मून (Cold Moon) का म्हणतात ?
आपल्यापैकी अनेक जणांनी ब्लू मून, सुपर मून, हार्वेस्ट मून, स्ट्रॉबेरी मून, पिंक मून आणि ब्लड मून अशी अनेक नावं ऐकली असतील. त्यापैकीच एक आहे तो कोल्ड मून, जो डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला दिसतो. कोल्ड मूनमागील संपूर्ण विज्ञान समजून घ्यायचं झालं तर हा शब्द अमेरिकन आणि युरोपियन घटनांवरून आला आहे. कोल्ड मूनला “लाँग नाईट मून” असेही म्हणतात, ज्यावरून डिसेंबर महिन्यातील रात्रींच्या लांबीचा संदर्भ येतो.
कोल्ड मून ही एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये चंद्र सुमारे 99.5 टक्के दिसतो. डिसेंबर हा थंडीचा महिना असतो आणि सूर्य लवकर मावळतो. या महिन्यात काही ठिकाणी बहुतांश वेळेस 15-16 तास अंधार असतो. म्हणून याला लाँग नाइट मून असेही म्हटले जाते.