
भूकंप… ही एक अशी नैसर्गिक आपत्ति असते ज्याची सर्वांनाच भीती वाटते. जमीनीसकट सगळंच हादरवणाऱ्या या भूकंपाची सगळ्यांच्याच मनात भीती असतेच. गुरुवारी दिल्लीमध्ये भूकंप झाला, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 इतकी मोजली गेली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे, केवळ दिल्लीतच नव्हे तर एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्येही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. सहसा, जेव्हा जेव्हा भूकंप होतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो की या काळात पृथ्वी कंप पावते, ज्यामुळे मोठा विनाश होतो. इमारती, शाळा, ऑफीसेस, दुकानं पडझडीमुळे अनेक गोष्टींचं नुकसान होतं, झाडं कोसळतात, वित्तहानी तर होतेच पण मनुष्यहानी, जीवितहानी होण्याचाही धोका असतोच. जसा भूकंप होतो, तसंच तुम्ही स्पेसक्वेक (Spacequake) बद्दल ऐकलं आहे का ?
स्पेसक्वेक (Spacequake) म्हणजे काय ?
ज्याप्रमाणे आपल्या पृथ्वीवर भूकंप होतात, तसेच अवकाशातही भूकंप होतात, ज्यांना अवकाशकंप (Spacequake) असं म्हणतात. मात्र, अंतराळात भूकंप होण्याचे कारण पृथ्वीवरील भूकंपांपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. खरंतर, पृथ्वीवरील भूकंप टेक्टोनिक प्लेट्समुळे होतात. जेव्हा पृथ्वीच्या आतील टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा आपल्याला हादरे जाणवतात, आपण त्यांना भूकंप म्हणतो. मात्र असंच हे अंतराळात घडत नाही.
अंतराळात भूकंप होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुंबकीय क्षेत्रात ऊर्जेची जास्त हालचाल, ज्याचा आपल्या पृथ्वीवरही परिणाम होतो. खरं तर, आपल्या पृथ्वीभोवती एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे, ज्याला मॅग्नेटोस्फीअर म्हणतात.
अंतराळातून किंवा अवकाशातून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आणि सौर किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणे हे मॅग्नेटोस्फीअर किंवा या चुंबकीय क्षेत्राचे काम असते. तथापि, कधीकधी सूर्याकडून येणाऱ्या सौर वाऱ्यांचा प्रवाह इतका वेगवान होतो की ते चुंबकीय क्षेत्रावर आदळतात, ज्यामुळे खेचलं जातं, ताण निर्माण होते. यामुळे अवकाशातील किंवा अंतराळातील भूकंप होतात.
सहसा, पृथ्वीवरील भूकंपांमुळे अनेक प्रकारचे नुकसान होते, ज्यामध्ये झाडं, इमारती कोसळणे आणि जमिनीवर भेगा पडणे यांचा समावेश होतो. तथापि, अवकाशातील भूकंपांमुळे विद्युत चुंबकीय लाटा निर्माण होतात, ज्या उपग्रह, पॉवर ग्रिड, दूरसंचार यावर परिणाम करतात.