
गुगलने २०२५ या वर्षातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांची (Year in Search 2025) अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या अहवालानुसार, यंदा भारतीयांच्या सर्च ट्रेंडमध्ये क्रिकेटची क्रेझ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयातील कुतूहल आणि सांस्कृतिक घडामोडींचे वर्चस्व दिसून आले. आयपीएल २०२५ आणि गुगलचे एआय टूल जेमिनी या वर्षीचे सर्वात मोठे सर्च ट्रेंड ठरले आहेत. गुगलने प्रसिद्ध केलेल्या इयर इन सर्च २०२५ अहवालातील टॉप १० ट्रेंडिंग विषयांची सविस्तर माहिती समोर आली आहे.
१. आयपीएल २०२५ (IPL 2025): भारतीयांच्या क्रिकेटवरील अफाट प्रेमामुळे यंदाही आयपीएल सर्च लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले. युजर्सनी प्रामुख्याने लिलाव, लाइव्ह स्कोअर आणि सामन्यांच्या वेळापत्रकाबद्दल माहिती शोधली.
२. गुगल जेमिनी (Google Gemini): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे गुगलचे जेमिनी हे एआय टूल दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सर्च विषय ठरले. ज्याचा वापर लोकांनी अभ्यास आणि नवनवीन निर्मितीसाठी केला.
३. आशिया कप (Asia Cup): क्रिकेटमधील भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तीव्र उत्सुकतेमुळे आशिया कप या स्पर्धेने सर्च लिस्टमध्ये टॉप ३ चे स्थान पटकावले.
४. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी: जागतिक स्तरावरील या महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धेच्या निकालांनी आणि भारताच्या कामगिरीने क्रीडाप्रेमींना गुगलवर खिळवून ठेवले.
५. प्रो कबड्डी लीग: क्रिकेट व्यतिरिक्त कबड्डी या अस्सल मातीतील खेळालाही भारतीयांनी मोठी पसंती दिली आहे. खेळाडू आणि सामन्यांच्या माहितीसाठी याचा खूप शोध घेतला गेला.
६. महाकुंभ मेळा: प्रयागराज येथे होणाऱ्या भव्य महाकुंभ मेळ्यामुळे हा विषय न्यूज इव्हेंट्समध्ये अव्वल ठरला. भाविकांनी प्रामुख्याने प्रवासाचे नियोजन आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती घेतली.
७. महिला क्रिकेट विश्वचषक: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयामुळे आणि जेमिमा रॉड्रिग्स, स्मृती मानधना यांच्यासारख्या स्टार खेळाडूंमुळे ही स्पर्धा ट्रेंडिंगमध्ये राहिली.
८. ग्रॉक (Grok): एलॉन मस्क यांच्या एक्स (X) प्लॅटफॉर्मवरील एआय चॅटबॉट ‘ग्रॉक’बद्दल भारतीयांमध्ये मोठे कुतूहल दिसून आले, ज्यामुळे या तंत्रज्ञानाचा शोध मोठ्या प्रमाणावर झाला.
९. सैय्यारा (Saiyaara): अहान पांडे आणि अनीत पडा या नव्या जोडीच्या सैय्यारा चित्रपटाने मनोरंजनाच्या यादीत बाजी मारली. यातील गाणी आणि कथा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाली.
१०. धर्मेंद्र: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या गौरवशाली कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्समुळे ते यावर्षीच्या टॉप १० सेलिब्रिटी सर्चमध्ये समाविष्ट झाले.