
गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची आकडेवारी आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा उच्छादाने त्रस्त असलेल्यांना दिलासा मिळाला आहे. तर प्राणीप्रेमींनी या निर्णयाचा विरोध केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आणि आकडेवारी पाहता हे प्रकरण गंभीर असल्याचं दिसत आहे. 2024 या एका वर्षात कुत्र्यांनी 37 लाखाहून अधिक लोकांना चावा घेतल्याचं समोर आलं आहे. नुकतंच एका दिग्गज कबड्डीपटूचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे दिसून येतं. पण कुत्रे कोणाला आणि कधी चावतात? कधी आक्रमक होतात? चला जाणून घेऊयात याची कारणं
कुत्रे माणसावर हल्ले करण्याचं सर्व मुख्य कारण म्हणजे असुरक्षित असणं. माणसाकडून काही धोका वाटत असेल तर ते आक्रमक होत चावतात. द स्प्रूस पेट्सच्या अहवालानुसार, जेव्हा कुत्रा समोर येते तेव्हा हे जाणून घेणं गरजेचं आहे की ते आक्रमक होतात. त्यांचे चावण्याचं कारण काय?
स्वत:ची किंवा कुटुंबाची सुरक्षा : कुत्रा स्वत:साठी आणि त्या भागाची सुरक्षा किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचं रक्षण करण्यासाठी चावू शकतात. मादी आपल्या पिल्लांचं रक्षण करण्यासाठी जास्त आक्रमक असते.
अचानक जाग आल्यानंतर किंवा घाबरल्यावर : झोपलेला कुत्रा अचानक जागा झाला तर तो दचकतो आणि चावू शकतो. कुत्र्याला अशा स्थितीत समोरचा शत्रू आहे की नाही हे ओळखणं कठीण असतं. त्यामुळे तो आक्रमक होतो .
दुखापत किंवा आजारी असल्यावर : जर कुत्रा कोणत्याही प्रकारच्या दुखापत, आजार किंवा वेदनांनी त्रस्त असेल तर आक्रमक होतो. अशा परिस्थितीत कुत्रा स्वत:ला त्याच्या आवडत्या व्यक्तीजवळ जाण्यापासून किंवा त्याचा स्पर्श होण्यापासून दूर ठेवतो.
मोठा आवाजामुळे : कु्त्र्याला मोठा आवाज सहन होत नाही. त्यामुळे कुत्रा आक्रमक होतो. कुत्र्याला डिवचणे, त्याला रस्त्यावर सोडून जाणे, किंवा बाजूने बाईक जोराने गेल्यानतंर कुत्रे आक्रमक होतात.
कुत्र्यापासून दूर पळाल्यानंतर : खेळत असताना कुत्र्यापासून अचानकपणे दूर पळून जाणं हे देखील कुत्रा चावण्याचं कारण ठरू शकते. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती असं केल्याने आक्रमक होतात. कुत्रे त्या व्यक्तीला शिकारी समजतात आणि त्याच्या मागे चावण्यासाठी धावतात.
मालकाच्या परवानगीशिवाय कुत्र्याजवळ जाऊ नका किंवा त्याला स्पर्श करू नका. कुत्रे जेवत असताना, झोपत असताना किंवा त्यांच्या पिल्लांची काळजी घेत असताना त्यांच्या जवळ कधीही जाऊ नका. जखमी कुत्र्याजवळ जाऊ नका, त्याला स्पर्श करू नका किंवा हलवण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही कारणास्तव लहान मुलाला किंवा बाळाला कुत्र्यासोबत एकटे सोडू नका. जर कुत्रा तुमच्यावर हल्ला करत असेल तर शांत रहा आणि डोळ्यांचा संपर्क टाळा. धावू नका किंवा ओरडू नका. कुत्रा शांत झाल्यावर हळूहळू मागे सरका.