पृथ्वीवरची रहस्यमयी जागा, जिथं पाय ठेवताच होतो मृत्यू; हजारो साप…

या जगात असं एक ठिकाण आहे, जिथं गेल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो. इथं फक्त सापच साप आहेत. त्यामुळे इथे पाय ठेवतानाही काळजी घ्यायला हवी, असे म्हटले जाते.

पृथ्वीवरची रहस्यमयी जागा, जिथं पाय ठेवताच होतो मृत्यू; हजारो साप...
snake island
| Updated on: Jul 01, 2025 | 5:26 PM

Snake Island : पृथ्वीवर अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत. काही ठिकाणी तर अद्याप माणूस जाऊही शकलेला नाही. काही ठिकाणाचं गूढ तर माणसाला अजूनही समजलेलं नाही. पृथ्वीवर अशीच एक रहस्यमयी जागा आहे. या जागेला स्नेक आयलँड म्हटलं जातं. इथं तुम्हाला हजारो साप पाहायला मिळतात. तुम्ही सापांना घाबरत असाल तर या जागेवर जाणं टाळायलाच हवं.

4000 पेक्षा अधिक साप

स्नेक आयलँड ही जागा म्हणजे हजारो सापांचं घर आहे. प्राथमिक माहितीनुसार इथे तब्बल 4000 पेक्षा अधिक साप आहेत. दक्षिण अमेरिकेच्या ब्राझील देशात साओ पाऊलो नावाचे एक शहर आहे. या शहरापासून साधारण 90 मैल अंतरावर एक बेट आहे. या बेटाला क्युईमाडा ग्रांडे असे म्हटले जाते. मात्र या बेटावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे साप आढळतात. त्यामुळेच या जागेला स्नेक आयलँड म्हटले जाते.

इथं नेमके कसे साप आढळतात?

स्नेक आयलँडवर साधारण साप आढळत नाहीत. या  बेटावर गोल्डन लान्सहेड नावाचे साप आहेत.हा साप जगातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक आहे. या सापाचे विष जगात कोणत्याही भागात आढळणाऱ्या सापांच्या तुलनेत तीन ते पाच पटींनी विषारी असल्याचे बोलले जाते. या सापच्या विषामुळे मानवी मांस वितळते असे म्हटले जाते.हा साप चावला की माणसाचा एका तासाच्या आत मृत्यू होतो.

11 हजार वर्षांपूर्वी…

म्हणूनच या स्नेक आयलँडवर जाणं धोकादायक ठरू शकतं, असं म्हटलं जातं. मात्र या बेटावर एवढ्या मोठ्या प्रमाणात साप कुठून आले, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साधारण 11 हजार वर्षांपूर्वी हे बेट मुख्य भूमीपासून वेगळे झाले. अमेझॉनच्या जंगलापासून हे बेट वेगळे झाले. त्यामुळे या प्रक्रियेत जे साप या बेटावर राहिले त्यांना त्याच भागात राहावे लागले. विशेष म्हणजे सापांची शिकार करणारा दुसरा प्राणी नसल्यामुळे इथे सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, असे सांगितले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)