Railway Station: देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथं थांबत नाही ट्रेन, कारण तरी काय?
Indian Railway Station: भारतात रेल्वेचे मोठे जाळे आहे. दूरच्या प्रवासासाठी रेल्वे हा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय मानला जातो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेचा वापर करतात. पण देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे जिथं एकही रेल्वे, मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर थांबत नाही.

Indian Railway Station: देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. दूरच्या प्रवासासाठी रेल्वे हा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय मानला जातो. रोज लाखो प्रवासी विविध रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. देशातील अनेक जंक्शन असे आहेत, जिथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेही थांबतात. काही रेल्वे स्टेशन गजबजलेली असतात. तिथे कायम लोकांचा राबता असतो. पण देशातील एकमेव रेल्वे स्टेशन असे आहे जिथे एकही मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर थांबत नाही. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद (Singhabad) हे ते स्टेशन आहे. भारत-बांग्लादेश सीमेवरील एकमेव आणि अखेरचे रेल्वे स्टेशन आहे.
का थांबत नाही इथं ट्रेन?
भारत-बांग्लादेश सीमेवर सिंहाबाद हे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या पुढे अगदी हाकेच्या अंतरावर बांगलादेशची सीमा सुरू होते. 1947 मध्ये देशाची फाळणी होण्यापूर्वी कोलकत्ता आणि ढाका या दोन शहरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा रेल्वे रूट होता. महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अन्य महान नेत्यांनीही या रेल्वे मार्गावरून प्रवास केला आहे. त्याची इतिहासात नोंद आहे. पण फाळणीनंतर दोन्ही देशांमधील रेल्वे वाहतूक खंडित झाली होती. तर या स्थानकावरून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबवली गेली. त्यानंतर हे रेल्वे स्टेशन अक्षरशः ओस पडलं होतं.
सध्या या स्थानकाचा वापर कशासाठी होतो?
अर्थात प्रवासी रेल्वे इथं थांबत नाही. सिंहाबाद स्थानक मात्र कार्यरत आहे. 1978 मध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्यात करार झाला. त्यानंतर या मार्गावरून मालवाहू गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या या स्थानकाचा वापर केवळ भारत आणि बांग्लादेश या दोन देशादरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मालगाड्यांच्या तपासणीसाठी आणि सिग्नल देण्यासाठी ट्रान्झिट पॉईंट म्हणून केला जातो.
इंग्रजकालीन यंत्रणा आणि रेल्वे कर्मचारी
या रेल्वे स्थानकावर आजही तिकीट खिडक्या, प्रतिक्षालय आणि ब्रिटिशकालीन जुनी सिग्नल यंत्रणा जशाच्या तशा पाहायला मिळत आहे. इथं रेल्वेचे कर्मचारी नियमितपणे ड्युटीवर येतात. पण त्यांच्याकडे इतर कामं सोपवण्यात आली आहे. इथं प्रवाशी नसल्याने कर्मचारी मालगाड्यांची नोंद ठेवतात. सिग्नल देतात. या रेल्वे स्थानकापासून पायी चालत गेल्यास बांगलादेशची सीमा लागते. विशेष म्हणजे आजकाल अनेक कॉन्टेट क्रिएटर या स्टेशनला भेट देऊन ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतात.
