
Why birds dont get electric shock : तुम्ही तुमच्या आजूबाजूला विजेच्या तारा पाहिल्या असतील. या विजेच्या तारांमध्ये हाय व्होल्टेजची वीज वाहून नेली जाते. या तारांना तुमचा चुकूनही हात लागला तर त्याच क्षणाला मृत्यू होण्याची शक्यता आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या तारा दिसल्या तर दूर राहावे, चुकूनही हात लावू नये, असे सांगितले जाते. पण पक्ष्यांच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. विजेच्या तारांवर पक्षी बसल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्यांना मात्र विजेचा धक्का लागत नाही. त्यामुळे पक्ष्यांना विजेचा झटका का लागत नाही? त्यामागे नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊ या…
जेव्हा कधी पक्षी विजेच्या तारेवर बासतो तेव्हा त्या पक्ष्याचे दोन्ही पाय एकाच विजेच्या तारेवर असतात. त्यामुळे वीज वाहत असताना त्यातील इलेक्ट्रॉन्स पक्ष्यांच्या शरीरातून जात नाहीत. परिणामी त्यांना विजेचा झटका बसत नाही. दुसरी बाब म्हणजे पक्षी जेव्हा विजेच्या तारेवर बसलेले असतात तेव्हा त्यांचा जमिनीशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नसतो. जमिनीशी संपर्क न आल्याने विजेतील इलेक्ट्रॉन जमिनीकडे जाण्यास कोणताही मार्ग नसतो. परिणामी पक्ष्यांना धक्का बसत नाही.
पक्ष्यांना एका विशिष्ट स्थितीत विजेचा धक्का बसू शकतो. पक्षी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या तारांवर बसले आणि किंवा पक्ष्यांनी एकाच वेळी विजेच्या वेगवेगळ्या तारांना स्पर्श केला आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांचा जमिनीशी संपर्क आला तर पोटॅन्शियल डिफरन्समुळे त्यांच्या शरीरातून वीज प्रवाहित होईल आणि त्यांना झटका बसेल. त्यामुळेच कधी-कधी मोठ्या पक्ष्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू होतो. तशा काही घटना तुम्ही याआधी पाहिल्याही असतील. परंतू बऱ्याच पक्ष्यांना विजेच्या तारेवर बसल्यानंतर विजेचा धक्का लागत नाही.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)