पंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक

| Updated on: Dec 15, 2019 | 5:36 PM

मी सांगितलेली माहिती गूगलवरुन घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करीच झाली आहे' असं पायल रोहतगीने अटकेनंतर ट्वीट केलं.

पंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक
Follow us on

जयपूर : ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला राजस्थान पोलिसांनी अटक केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्यामुळे पायलला बेड्या ठोकण्यात आल्या (Actress Payal Rohatgi arrested).

पायलला आज (रविवार) सकाळी अहमदाबादमधून अटक करण्यात आली. त्यानंतर खुद्द पायलनेच आपल्या अटकेचं वृत्त ट्विटरवरुन जाहीर केलं.

पायलने पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला टॅग करुन ट्विटरवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ केल्यामुळे मला राजस्थान पोलिसांनी अटक केली. मी सांगितलेली माहिती गूगलवरुन घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करीच झाली आहे’ असं पायलने ट्वीट केलं.


माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मॉडेल आणि अभिनेत्री पायल रोहतगीला बुंदी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक ममता गुप्ता यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिली. तिच्याविरोधात कलम 66 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाली होती पायल रोहतगी?

‘मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो मला आत्ताच समजला. जेव्हा महाराज हरी सिंह यांनी शेख अब्दुल्ला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं, तेव्हा त्यांचे वकील पंडित जवाहरलाल नेहरु होते, असं म्हटलं जातं. ही गोष्ट खरी आहे की खोटी? जर खरी असेल, तर जवाहरलाल नेहरु यांचं देशद्रोही वर्तन आता मला समजतं’ असं पायल रोहतगी (Actress Payal Rohatgi arrested) म्हणाली होती.

‘मला वाटतं की मोतीलाल नेहरु यांच्या पाच पत्नी होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरु हे जवाहरलाल नेहरु यांचे सावत्र वडील होते’ असा व्हिडीओ करणाऱ्या पायलने आपल्या दाव्यात एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता.