Anil Devgan | दिग्दर्शक अनिल देवगन यांचे निधन, धाकट्या भावाला गमावल्याने अजय देवगन भावूक

| Updated on: Oct 06, 2020 | 5:36 PM

अजय देवगनचे काका प्रकाश देवगन यांचे पुत्र अनिल देवगन यांनी वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Anil Devgan | दिग्दर्शक अनिल देवगन यांचे निधन, धाकट्या भावाला गमावल्याने अजय देवगन भावूक
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचे (Ajay Devgn) चुलत बंधू अनिल देवगन (Anil Devgan) यांचे निधन झाले. अजयने भावाचा फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन ही दुःखद बातमी दिली. कार्डिअॅक अरेस्टने अनिल देवगन यांची प्राणज्योत मालवली. (Ajay Devgn’s brother Anil Devgan dies of Cardiac arrest)

‘माझा भाऊ अनिल देवगनला मी काल रात्री गमावले. त्याचे दुर्दैवी निधन आमच्या कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. ADFF (अजय देवगन फिल्म्स) आणि माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याची नेहमी आठवण येईल. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करा’ अशा भावना अजयने फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रार्थना सभेचं आयोजन करु शकलेलो नाही’ असं अजयने लिहिलं आहे. अजयच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी अनिल देवगन यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल हे अजय देवगनचे काका प्रकाश देवगन यांचे पुत्र होते.

अनिल देवगनचे निधन हा खरोखरच बॉलिवूडसाठी मोठा धक्का मानला जातो. अनिल देवगनने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जीत, जान, इतिहास, प्यार तो होना ही था अशा अनेक चित्रपटांचा सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं होतं. राजू चाचा, ब्लॅकमेल आणि हाल-ए-दिल यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ते ओळखले जात. अजय देवगनच्या ‘शिवाय’, ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटांचे ते क्रिएटिव्ह दिग्दर्शक होते.

अजयचे वडील आणि बॉलिवूडमधले स्टंट दिग्दर्शक वीरु देवगन यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. अजयने मे महिन्यात ट्विटरवर वडिलांना त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली होती.