भाजप आमदारासह शहराध्यक्षावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा गुन्हा

| Updated on: Sep 19, 2019 | 8:00 AM

जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार (BJP MLA) चरण वाघमारे (Charan Waghmare) आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे (Anil Jibhkate) यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molestation of Women Police Officer) केल्याचा आरोप झाला आहे.

भाजप आमदारासह शहराध्यक्षावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा गुन्हा
Follow us on

भंडारा: जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार (BJP MLA) चरण वाघमारे (Charan Waghmare) आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे (Anil Jibhkate) यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molestation of Women Police Officer) केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी आमदार चरण वाघमारे यांनी देखील पोलीस स्टेशन गाठत घटनेची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस स्टेशनला दिले.

तुमसर बाजार समितीमध्ये 16 सप्टेंबरला कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यावेळी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्थितीत घरी कशी जाणार असे विचारले. त्यावर तेथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषेचा उपयोग केला. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आमदार चरण वाघमारे देखील तेथे आले. तेही महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलले.

अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचा हात पकडून धक्काही दिला. या प्रकरणाने हादरलेल्या महिला अधिकाऱ्यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आमदार आणि शहराध्यक्षाविरुद्ध कलम 353, 354, 472, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदार वाघमारे आणि शहराध्यक्ष जिभकाटे यांना अद्यापही अटक झालेली नाही. या प्रकरणी आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह तुमसर पोलीस स्टेशन गाठले आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्याचे निवेदन दिले आहे.