वायू दलाच्या ताफ्यात दाखल झालेलं अपाचे हेलिकॉप्टर नेमकं कसं आहे?

| Updated on: Sep 03, 2019 | 9:48 PM

भारत हायटेक युद्धासाठी सज्ज झाल्याचं चित्रं आहे. चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारी देश असताना भारताची हवाई सुरक्षा (Apache Helicopter India) आणि प्रतिकार क्षमता आणखी वाढली आहे.

वायू दलाच्या ताफ्यात दाखल झालेलं अपाचे हेलिकॉप्टर नेमकं कसं आहे?
Follow us on

मुंबई : भारतीय वायू दलाला देशाचं संरक्षण करणासाठी जगातील सर्वात शक्तीशाली असं हवाई अस्त्र मिळालंय. केवळ संरक्षणच नाही, तर शत्रूच्या हद्दीत घुसून त्याला धडा शिकवणारे अपाचे हेलिकॉप्टर्स (Apache Helicopter India) भारतीय वायू दलाच्या ताफ्यात सामिल झाले आहेत. त्यामुळे आता भारत हायटेक युद्धासाठी सज्ज झाल्याचं चित्रं आहे. चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारी देश असताना भारताची हवाई सुरक्षा (Apache Helicopter India) आणि प्रतिकार क्षमता आणखी वाढली आहे.

भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या अस्त्राचं नाव अपाचे AH-64 हेलिकॉप्टर्स आहे. हे हेलिकॉप्टर फक्त आणि फक्त युद्धात वापरले जातात. शत्रूला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासाठी आठ अपाचे हेलिकॉप्टर्स भारतीय वायू दलाच्या ताफ्यात सामील झाले आहेत.

पाकिस्तानी सीमेला लागूनच असलेल्या पठाणकोट हवाईतळावर अमेरिकन बनावटीचे अत्याधुनिक आठ अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी हे हेलिकॉप्टर वायू दलात सामील होण्याआधी अपाचे हेलिकॉप्टर्सला वॉटर कैननने सलामी देण्यात आली. त्यानंतर वायू दल प्रमुख बीएस धनोआ आणि वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल आर नांबियार यांनी अपाचे हेलिकॉप्टर्सची पूजाही केली. त्यानंतर बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ते यांनी या अटॅक हेलिकॉप्टर्सची चावी एअर चीफ मार्शल धनोआ यांच्याकडे सोपवली आणि या लढाऊ हेलिकॉप्टर्सने आकाशात भरारी घेतली.

अपाचे AH-64 हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

  • अपाचे AH-64 मल्टी रोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर असून युद्धात हल्ल्यासाठी वापरले जाणारे एकमेव हेलिकॉप्टर आहे.
  • विशेष बनावटीमुळे शत्रूच्या रडारमध्ये सहज दिसत नसल्याने सुरक्षा भेदण्यात सक्षम आहे.
  • 293 कि.मी. प्रतितास वेगाने उड्डाण करण्याची क्षमता
  • क्षेपणास्त्रांनी परिपूर्ण असे हे अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत
  • दिवसा किंवा रात्री कोणत्याही वातावरणात कारवाई करण्याची ताकद यामध्ये आहे.
  • डोंगर, पर्वतांवरील शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यास सक्षम

आणखी अपाचे येणार

सध्या भारतीय हवाईदलात आठ अपाचे हेलिकॉप्टर्स दाखल झाले आहेत. 2020 पर्यंत असे तब्बल 22 अपाचे हेलिकॉप्टर्स दाखल होणार आहेत. पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या 150 किलोमीटरवर आणि दिल्लीपासून 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या पठाणकोट एअरबेसवर हे जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर तैनात राहणार आहेत.

अपाचे AH-64 चा इतिहास

  • 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली
  • 1984 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आलं.
  • 1986 मध्ये हे हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आलं
  • अमेरिकेशिवाय नेदरलँड्स ,इजिप्त ,इस्रायलच्या ताफ्यातही अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत.
  • इस्त्रायलने लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवाईसाठी याच हेलिकॉप्टरचा वापर केलाय

भारताने याआधीच अनेकदा पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकवला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या मिराज 2000 विमानांनी बालाकोटमध्ये घुसून पाकवर एअर स्ट्राईक केलं. आता तर अपाचे एएच-64 सारखं जगातील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तीशाली हेलिकॉप्टर भारताकडे आल्याने आणि पाकिस्तानच्या अगदी हद्दीच्या जवळ पठाणकोटमध्येच हे हुकमी अस्त्र तैनात झाल्याने पाकिस्तानची बोलती बंद होण्यास मदत होणार असल्याचं जाणकार सांगतात.

अपाचे हेलिकॉप्टर्स दाखल होण्यापूर्वीच वायू दलाच्या ताफ्यात चिनूक हेविवेट हेलिकॉप्टर्सही दाखल झाले आहेत. तसंच येत्या काही दिवसात राफेल विमानांचा अत्यंत शक्तीशाली ताफाही भारताकडे येणार आहे. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहताना आणि भारताला युद्धाची चिथावणी देताना शत्रूला शंभर वेळा विचार करावा लागेल, एवढं मात्र निश्चित.