प्रशासनाचा अजब कारभार, कोल्हापुरात बंदी आदेश

| Updated on: Aug 12, 2019 | 4:00 PM

आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष/संघटनांकडून विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलनं होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूरमध्ये बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रशासनाचा अजब कारभार, कोल्हापुरात बंदी आदेश
Follow us on

कोल्हापूर : पूरपरिस्थितीने आधीच बेजार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Flood) प्रशासनाने अजब निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात 24 ऑगस्ट 2019 पर्यंत बंदी आदेश (Ban Orders) लागू करण्यात आला आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन-उपोषणासारखे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्तांना मदत पोहचण्यास विलंब होत असल्यामुळे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. गोंधळात भर पडू नये, यासाठी खबरदारी म्हणून बंदी लागू करण्यात आली आहे.

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण 12 ऑगस्ट रोजी (आज) साजरा होत आहे. तर 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असेल. त्याचप्रमाणे 24 ऑगस्ट रोजी दहीहंडी असल्यामुळे एखादं औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष/संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलनं जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात एखादी अनपेक्षित घटना घडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2019 रात्री 12 वाजेपर्यंत बंदीचे आदेश जारी केले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिक पुराने हैराण आहेत. दोन्ही जिल्ह्यांना आठवडाभरापासून पुराने वेढा दिला आहे. महापुराचं पाणी ओसरत असलं, तरी पूरग्रस्तांपुढे आव्हानांचा पूर मात्र कायम आहे. शुद्ध पाणी, खाद्यपदार्थ, शेती, रोगराई, राहण्याची व्यवस्था, मालमत्तेची हानी, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, यासारख्या समस्यांचा विळखा सैल होताना दिसत नाही.

एकीकडे शेतकर्‍यांना ‘ऐ तू गप्प बस’ अशा धमक्या आणि दुसरीकडे पूरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपने बंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

पुणे-बंगळुरु महामार्ग अत्यावश्यक वाहनांसाठी खुला

गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळुरु महामार्ग हा अत्यावश्यक गोष्टींच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी 11 ऑगस्टला दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या.

नद्यांना आलेल्या महापुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कोल्हापुरात अनेक रस्ते, महामार्ग हे पाण्याखाली गेले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे गेल्या 5 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले.