दरवाजे-खिडक्या बंद करुन बस थेट पोलिस स्टेशनात, बारामतीत दागिनेचोर महिलांची टोळी ‘फिल्मी स्टाईल’ जेरबंद

| Updated on: Jan 25, 2020 | 6:40 PM

पोलिसांनी अश्विनी अमोल सावंत यांचे 15 तोळे सोन्याचे दागिने पाच महिलांच्या टोळीकडून हस्तगत केले आणि आरोपींना जेरबंद केलं

दरवाजे-खिडक्या बंद करुन बस थेट पोलिस स्टेशनात, बारामतीत दागिनेचोर महिलांची टोळी फिल्मी स्टाईल जेरबंद
Follow us on

बारामती : सैनिक पत्नीचे 15 तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पाच महिलांना बारामतीकरांनी रंगेहाथ (Baramati Bus Jewellery Theft) पकडलं. सातारा-करमाळा बसमध्ये हा फिल्मी स्टाईल प्रकार घडला. सांगवीला निघालेल्या माहेरवाशिणीचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.

साताऱ्यात राहणाऱ्या अश्विनी अमोल सावंत सांगवीतील माहेरी येण्यासाठी निघाल्या होत्या. साताऱ्यातून त्यांना सातारा करमाळा ही बारामतीमार्गे जाणारी बस मिळाली. त्या आपल्या मुलांसह सांगवीत उतरल्या, तेव्हा आपले दागिने चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लागलीच स्थानिक ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला.

संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष किरण तावरे, महेश तावरे, राजेंद्र तावरे यांनी बारामती शहरातील फलटण नाक्यावर ही बस थांबवली. बसचे दरवाजे आणि काचा बंद करुन चालकाला बस पोलिस ठाण्यात घेण्याची सूचना केली. त्यामुळे गडबडलेल्या संशयित महिलांनी आम्हाला इथेच उतरायचं आहे, असा आग्रह धरला. तेव्हा सर्वांचा त्यांच्यावर संशय बळावला.

महिलांनी चोरलेले दागिने बसमधून बाहेर फेकू नयेत, यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी बसच्या दोन्ही बाजूने दुचाकींवर काही जणांना पाठीमागे येण्यास सांगितलं. बस शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी बसची झाडाझडती घेण्याची सूचना केली.

हेही वाचा : नसिरुद्दीन शाहांच्या मुलीविरोधात गुन्हा, दवाखान्यातील महिलांना मारहाणीचा आरोप

पोलिसांनी बसमध्ये जाऊन शोध घेतला असता पाच महिलांवर संशय आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर तब्बल 15 तोळे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली.

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने लुटणारी टोळी अगदी फिल्मी स्टाईलने पकडणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे शहरवासियांनी आणि पोलिसांनीही तोंडभरुन कौतुक केले. पोलिसांनी ज्योती राजू, मंजुळा वेंकटेश गाजवार, येलम्मा शंकर गाजवार, दीपा रघु गाजवार आणि गीता राजू (सर्व रा. नवी पाणी टाकीजवळ, सोलापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या सर्वांकडून पोलिसांनी अश्विनी अमोल सावंत यांचे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

साताऱ्यातून माहेरी आलेल्या अश्विनी सावंत यांना माहेरच्या लोकांकडून मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादामुळे व वाचलेल्या ऐवजामुळे अश्रू अनावर झाले होते. त्याचवेळी बारामतीकरांच्या दक्षतेचा प्रत्ययही या घटनेनंतर अनेकांना (Baramati Bus Jewellery Theft) आला.