Bigg Boss Marathi 3 | ‘तो’ परत येतोय! ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व, कोण कोण स्पर्धक?

| Updated on: Nov 25, 2020 | 3:01 PM

नुकतेच सलमान खानच्या हिंदी बिग बॉसची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता मराठी पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Bigg Boss Marathi 3 | तो परत येतोय! बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व, कोण कोण स्पर्धक?
Follow us on

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोमवारी रात्री ‘बिग बॉस मराठी’चा टीझर लाँच केला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bigg Boss Marathi Season 3 Teaser)

“पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा दिमाखात उघडणार बिग बॉसच्या घराचं दार” अशी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनचा टीझर रीलीज होताच पहिल्या पर्वाचा उपविजेता आणि अभिनेता पुष्कर जोग याने आनंद व्यक्त केला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन कधी येणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तिसऱ्या पर्वाच्या शुभारंभाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे पर्व सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट-मालिका यांची शूटिंग बंद होती. जुलै महिन्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर गाडी हळूहळू रुळावर आली आहे. मात्र अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नुकतेच सलमान खानच्या हिंदी बिग बॉसची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता मराठी पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक रात्रंदिवस एकत्र राहतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन कसे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरातील टास्कमध्येही कोरोनाशी निगडीत क्रिएटिव्ह खेळ पाहायला मिळू शकतात.

दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले होते. गेल्या वर्षी एक सप्टेंबरलाच दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले झाला होता. आता या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याची उत्सुकता वाढली आहे.