‘मुंबईचा बटाटा, पुण्याचा लसूण…’ शिवाजी कर्डिलेंच्या पत्नीचा ‘रुचकर’ उखाणा

सोशल मीडियावर सध्या भाजपचे नेते आणि अहमदनगरचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पत्नी अलका कर्डिले यांचा उखाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय अहमदनगर-राहुरी मतदारसंघात तर सध्या अलका कर्डिले यांच्या उखाण्याची चर्चा सुरु आहे.

मुंबईचा बटाटा, पुण्याचा लसूण... शिवाजी कर्डिलेंच्या पत्नीचा रुचकर उखाणा
| Edited By: | Updated on: Feb 04, 2020 | 12:00 AM

अहमदनगर : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील विविध भागात हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजन करण्यात येतात. अनेक सामाजिक संघटनादेखील हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित (Alka Kardile Ukhana viral on social media) करतात. अशाच प्रकारचा एक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पत्नी अलका कर्डिले यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी अलका कर्डिले यांनी दोन उखाणे घेतले. मात्र यापैकी दुसरा उखाणा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत असून त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी राजकीय हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. संक्रांतीचे वाण देताना उखाणा घेण्याची पंरपरा आहे. त्यानुसार कार्यक्रमाचे निवेदक उद्धव काळापहाड यांनी अलका यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला. अलका कर्डिलेंनीही कोणतेही आढेवेढे न घेता रुचकर असा उखाणा घेतला.

“महादेवाच्या पिंडीला नागोबाचा येडा, शिवाजीराव आणि माझा जन्माचा जोडा” असा उखाणा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या पत्नी अलका कर्डीले यांनी घेतला.

याशिवाय “मुंबईचा बटाटा, पुण्याचा लसूण, खोबरं घालते किसून, शिवाजी राव आले फॉर्चुनरमध्ये बसून, शब्द देते हसून”, असा अजून एक उखाणा अलका कर्डीले यांनी घेतला.

त्यांचा या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे . तसेच अहमदनगर-राहुरी मतदारसंघात त्यांच्या उखाण्याची चर्चा सुरु आहे.

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात निवेदक उद्धव काळापहाड यांच्या गाण्यांचाही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामुळे कार्यक्रम चांगलाच रंगात आला होता. दरम्यान, निवेदक उद्धव काळापहाड यांनी अलका कर्डिले यांना उखाण्याचा आग्रह (Alka Kardile Ukhana viral on social media) केला.