कुमार विश्वास भाजपकडून राज्यसभेवर? भाजपच्या ‘त्या’ यादीत कुणाकुणाची नावे ?

| Updated on: Feb 06, 2024 | 12:46 PM

यूपी भाजपने राज्यसभेच्या 7 जागांसाठी 35 नावांचे पॅनल तयार केले आहे. या पॅनेलने कुमार विश्वास यांच्या नावावरही चर्चा केली आहे. तसेच सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे.

कुमार विश्वास भाजपकडून राज्यसभेवर? भाजपच्या त्या यादीत कुणाकुणाची नावे ?
Follow us on

नवी दिल्ली| 6 फेब्रुवारी 2024 : आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास लवकरच राज्यसभेवर जाऊ शकतात. भाजप त्यांना पक्षात न घेताच राज्यसभेवर पाठवू शकते. यूपी भाजपने राज्यसभेच्या 7 जागांसाठी 35 नावांचे पॅनल तयार केले आहे. या पॅनेलने कुमार विश्वास यांच्या नावावरही चर्चा केली आहे. तसेच सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.

उमेदवारांवर सुरू आहे विचारमंथन

सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या नावांवर चर्चा झाली. भाजपने सात जागांसाठी 35 उमेदवारांच्या नावांचे पॅनल तयार केले असून, त्यात सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचाही समावेश आहे. तसेच कुमार विश्वास यांचे नावही पॅनेलमध्ये ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे. मात्र,अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान कुमार विश्वास हे गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. आता अशा स्थितीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार की ते लोकसभा लढवणार याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. या नावांच्या माध्यमातून भाजपला जातीय आणि प्रादेशिक समीकरण तयार साधायचे आहे.

उत्तर प्रदेशमधील 10 जागा होणार रिक्त

उत्तर प्रदेशमधू राज्यसभेच्या 10 जागा रिक्त होत आहेत, त्यापैकी सात जागा भाजपच्या खात्यात, तर तीन जागा समाजवादी पक्षाच्या खात्यात जातील. 7 जागा भाजपच्या आणि दोन जागा समाजवादी पक्षाच्या खात्यात जातील, हे नक्की आहे पण, तिसऱ्या जागेसाठी समाजवादी पक्ष आणि भाजपात लढाई होऊ शकते, भाजपकडून आठवा उमेदवार उतरवण्याची देखील चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली बैठक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक हे दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच भूपेंद्र चौधरी आणि संघटनेचे सरचिटणीस धरमपाल सिंह उपस्थित होते. लवकरच केंद्रीय समितीकडे ही सर्व35 नावे पाठवली जाणार असून , त्यापैकी 7 नावांना भाजप हायकमांड मान्यता देईल.