Rakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा

| Updated on: Sep 24, 2020 | 11:25 AM

रकुल प्रीत सिंगला वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Rakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा
Follow us on

मुंबई : फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांनाही आज (24 सप्टेंबर) एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. सिमॉन खंबाटा सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली,परंतु रकुल प्रीत समन्स मिळाले नसल्याचे कारण पुढे करत चौकशीसाठी येण्यास टाळाटाळ केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मात्र तिचे दावे फेटाळून लावले आहेत. (Rakul Preet Singh allegedly refused to accept NCB summons)

रकुल प्रीत सिंगला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, फोनद्वारे तिला कळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

रकुल प्रीत सिंग समन्स स्वीकारत नसून, चौकशी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. तर, रकुल प्रीतला कुठलेही समन्स मिळाले नसल्याचे तिच्या टीमने म्हटले आहे. त्यामुळे रकुल प्रीत सिंग आज चौकशीस हजर राहणार नसल्याचे कळते आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. टीव्ही कलाकार अबीगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले. यासंदर्भात चौकशीसाठी दोघेही आज एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत.

दीपिका, सारा, श्रद्धाचीही चौकशी

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या आहेत, त्यापैकी एफआयआर क्रमांक 15/20 अंतर्गत अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी केली जाणार आहे. तर याच एफआयआर अंतर्गत एनसीबी रकुल प्रीत सिंगही चौकशी करेल. दुसर्‍या एफआयआरमध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे समाविष्ट आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपास करण्यास सुरुवात केली होती. एनसीबी जसजशी खोलवर तपास करतेय, तसतसे बडे मासे हाती लागताना दिसत आहेत. क्वीनचा निर्माता मधु मांटनेलाही एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबीच्या चौकशीत मधु मांटेनाचे नाव घेतले होते. एनसीबीकडून जया साहा, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, क्वॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने समन्स बजावल्याने फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आज (24 सप्टेंबर) चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. एनसीबीच्या प्रश्नांना ती कशाप्रकारे सामोरे जाणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या चौकशीत आता आणखी कोणाचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.