तुटलेल्या पुलाला लोखंडी शिडीचा आधार, नागरिकांचा दररोज जीवघेणा प्रवास

| Updated on: Aug 08, 2019 | 11:50 PM

जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांना जोडणारा पिंजाळ नदीवरील पूल रविवारी झालेल्या महापुरात वाहून गेला. यामुळे वाडा आणि विक्रमगड, जव्हारचा संपर्क तुटला आहे.

तुटलेल्या पुलाला लोखंडी शिडीचा आधार, नागरिकांचा दररोज जीवघेणा प्रवास
Follow us on

पालघर : जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांना जोडणारा पिंजाळ नदीवरील पूल रविवारी झालेल्या महापुरात वाहून गेला. यामुळे वाडा आणि विक्रमगड, जव्हारचा संपर्क तुटला आहे. वाहतुकीचा मुख्य मार्गच बंद झाल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. रस्त्या अभावी मलवाडा, पीक परिसरातील विद्यार्थी आणि नागरिक अर्धवट तुटलेल्या पुलाला लोखंडी शिडी बांधून दररोज जीवघेणा प्रवास करत आहेत.

पिंजाळ नदीवरील संबंधित पूल वाडा आणि विक्रमगड या दोन तालुक्यांना जोडतो. मात्र, मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात रविवारी हा पूल वाहून गेला. त्यामुळे 20 गावांचा संपर्क तुटला. जव्हार, नाशिक, कल्याण, ठाणे येथील सर्वच बसेस या मार्गावरुन जातात. मात्र, हा मार्गच बंद झाल्यामुळे वाडा येथील महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना येण्यासाठी लोखंडी शिडीची मदत घ्यावी लागत आहे. यामुळे अनेक नागरिक आणि विद्यार्थी रस्त्याअभावी आपला जीव धोक्यात टाकत आहेत. मात्र, प्रशासन अजूनही निद्रावस्थेतच असल्याचे दिसत आहे.

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी रात्री दिल्लीवरुन आल्यानंतर घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थानिक ग्रामस्थांना दुर्घटनाग्रस्त पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. पुलाजवळ मातीचा भराव न टाकता रस्त्यापर्यंत नवा सिमेंट काँक्रिटचा पूल तयार बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.