Corona | मुंबई-चंद्रपूर प्रवास, ‘फादर्स डे’च्या पार्टीतही सहभाग, कोव्हिड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर गुन्हा

| Updated on: Jun 26, 2020 | 5:24 PM

कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर चंद्रपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Corona | मुंबई-चंद्रपूर प्रवास, फादर्स डेच्या पार्टीतही सहभाग, कोव्हिड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर गुन्हा
Follow us on

चंद्रपूर : कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जोडप्यावर (Violation Of COVID-19 Rules) चंद्रपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून शहरात दाखल झाल्याची माहिती या जोडप्याने प्रशासनापासून लपविली होती. इतकंच नाही तर ते क्वारंटाईन राहण्याऐवजी उघडपणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचा नागरिकांना धाक बसावा म्हणून प्रशासनाने धडक कारवाई करत या जोडप्यावर थेट गुन्हा दाखल केला आहे. इतर कुणीही विनापरवाना-विना नोंदणी हॉटस्पॉट जिल्ह्यातून येऊ नये, असं आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे (Violation Of COVID-19 Rules).

13 जून रोजी हे जोडपं मुंबईहून चंद्रपुरात आले होते. शहरात आल्यावर प्रशासनाने तपासणी-नोंदणी आणि सल्ला याबाबत एक स्थळ निश्चित केले आहे. डॉक्टरी सल्ल्यानंतर गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय घेतला जातो.

मात्र, हे जोडपे खुशाल शहरात फिरत राहिले. कुठलीही माहिती अथवा तपासणी न करता सार्वजनिक ठिकाणी भ्रमण करत होते. धक्कादायक म्हणजे घरी ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने त्यांनी एक पार्टीही आयोजित केली होती. यातील पुरुषाला नंतर कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. बड्या घरचा मामला असल्याने कुणीही आवाज उचलला नाही. मात्र, कुजबुज वाढल्यावर नागरिकांनी कोरोना नियंत्रण कक्षात तक्रार केली.

मनपाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केल्यावर साथ रोगासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या भयंकर संकटात ‘सब चलता है’ वृत्ती बाळगणाऱ्या प्रवृत्तीला मनपाच्या यंत्रणेने जोरदार धक्का दिला आहे. मनपाने शहरात आल्यावर योग्य आगमन प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे (Violation Of COVID-19 Rules).

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प, आर्थिक तंगीला कंटाळून चंद्रपूरमध्ये सलून चालकाची आत्महत्या

चंद्रपूर कोरोना नियंत्रण कक्षातच नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डॉक्टरच्या लग्नाचा वाढदिवस