मी डॉन आहे, गोळ्या घालेन, पिण्याच्या पाण्याबाबत प्रश्न विचारणाऱ्याला ग्रामसेवकाची धमकी

| Updated on: Jul 18, 2019 | 3:11 PM

पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला, ग्रामसेवकाने गोळया घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर ग्रामसेवक थेट पिस्तूल घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मी डॉन आहे, गोळ्या घालेन, पिण्याच्या पाण्याबाबत प्रश्न विचारणाऱ्याला ग्रामसेवकाची धमकी
Follow us on

बुलडाणा : पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला, ग्रामसेवकाने गोळया घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर ग्रामसेवक थेट पिस्तूल घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

लोणार तालुक्यातील मातरखेड येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे. सरकारी पातळीवर पिण्याच्या पाण्याबाबत काय उपाययोजना केली ? असा प्रश्न विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थाला चक्क पिस्तुलीतून गोळया घालून मारेन, अशी धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.  इतकंच नाही तर ग्रामसेवकाचा पिस्तूल घेऊन नाचतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  यासंदभार्त घाबरलेल्या ग्रामस्थाने मेहकर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ग्रामसेवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मातरखेडच्या ग्रामसेवकाने गावातील विकासकामांकडे पाठ फिरवल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. याबाबत गावकऱ्यांनी पाणी, पथदिवे, रस्ते आणि ग्रामपंचायतीतील विकास योजनाबाबत ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले. गावातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असूनही याबाबत मला काय विचारता?  कुठं जायचे ते जा, असं उत्तर ग्रामसेवकाने दिले.

एका गावकऱ्याने पिण्याच्या पाण्याबाबत उपाययोजना करण्याची विनंती ग्रामसेवकाकडे केली. त्यावेळी चिडलेल्या ग्रामसेवकाने ‘मी डॉन असून तुला गोळ्या घालून ठार करेन’, अशी धमकी दिल्याचा आरोप, तक्रारदार ग्रामस्थाने केला. याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामसेवक हातात पिस्तूल घेऊन गाण्यावर थिरकतांनाचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.