पाकिस्तान आणि चीन एकत्र; पीओकेमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याची तयारी

| Updated on: Oct 09, 2020 | 11:37 AM

चीनकडून विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी सुविधा उभारण्यासाठी पाकला मदत केली जात आहे.

पाकिस्तान आणि चीन एकत्र; पीओकेमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याची तयारी
Follow us on

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता चीनने भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला हाती धरले आहे. पाकिस्तानचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी चीनकडून रसद पुरवली जात आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान आणि चिनी सैन्य भारताविरोधात एकत्र लढण्याची शक्यता वाढली आहे. (China is helping Pakistan)

रिसर्च अँण्ड अॅनालिसिस विंगच्या (R&AW) माहितीनुसार, चीनकडून विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी सुविधा उभारण्यासाठी पाकला मदत केली जात आहे. याअंतर्गत पीओकेमधील लसादाणा ढोक परिसरात नवीन क्षेपणास्त्र प्रणाली उभारली जात आहे. त्यासाठी सध्या या भागात पायाभूत सुविधांची उभारणी केली जातेय. जवळपास १३० पाकिस्तानी सैनिक आणि २५ ते ४० स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे बांधकाम सुरु आहे.

बाग जिल्ह्यातील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातून या क्षेपणास्त्र प्रणालीचे नियंत्रण केले जाईल. या नियंत्रण कक्षात पाकिस्तानी सैनिकांबरोबर चिनी लष्करातील तीन वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. अशाचप्रकारची आणखी एक क्षेपणास्त्र प्रणाली झेलम जिल्ह्यातील चिनाही येथेही उभारण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी आणि चिनी लष्कराच्या एकत्रीकरणासाठी हालचाली सुरु आहेत. जून महिन्यात बीजिंगमधील चिनी सैन्याच्या मुख्यालयात वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी नौदलाच्या हद्दीत चिनी युद्धनौकेची उपस्थिती दिसून आली होती.

त्यामुळे भविष्यात भारताला पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढावे लागू शकते. मात्र, भारत एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी समर्थ असल्याचा दावा लष्कराकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. आपल्या शेजारच्या आणि त्यापलीकडच्या प्रदेशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारत कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पूर्व लडाखमध्येही भारतीय सैन्य मोक्याच्या ठिकाणी तैनात आहे. चीनने त्यांची संपूर्ण हवाई ताकद पणाला लावली तरी त्यांना भारताला हरवता येणार नाही, असे वक्तव्य हवाईदलप्रमुख आरके. भदौरिया यांनी केले होते.

संबंधित बातम्या:

कोणत्याही परिस्थितीत भारतच चीनपेक्षा ‘भारी’- हवाईदलप्रमुख

INS Arighat | भारताची आण्विक पाणबुडी ‘अरिघात’ सज्ज, पाकिस्तानसह चीनच्या चिंतेत वाढ

LAC वरच्या सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा; फक्त आदेशाची गरज : लष्करप्रमुख नरवणे

(China is helping Pakistan)