चीनला मोदीच हवेत, पुन्हा भाजपच्या सत्तेसाठी चीन मदत करणार?
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भारताची चीनशी तुलना करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. चीन सर्वात मोठा निर्माता असल्यामुळे त्यांच्याकडे नोकऱ्यांची कमी नाही, तर भारतात निर्मिती उद्योग कमी असल्यामुळे नोकऱ्यांचीही वाणवा आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. पण मोदींची ही सर्वात मोठी समस्या सोडवण्यासाठी चीन स्वतः धावून येणार आहे. भारतात […]

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भारताची चीनशी तुलना करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. चीन सर्वात मोठा निर्माता असल्यामुळे त्यांच्याकडे नोकऱ्यांची कमी नाही, तर भारतात निर्मिती उद्योग कमी असल्यामुळे नोकऱ्यांचीही वाणवा आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. पण मोदींची ही सर्वात मोठी समस्या सोडवण्यासाठी चीन स्वतः धावून येणार आहे.
भारतात रोजगार निर्मिती करण्यासाठी चीन मोदींची मदत करणार असल्याचं चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’चं म्हणणं आहे. या वृत्तानुसार, भारतात रोजगारांअभावी मोदींना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतोय आणि ही गोष्ट चीनसाठी चांगली नाही. कारण, चीनला मोदी पुन्हा सत्तेत हवे आहेत.
“डोकलाम वादानंतर चीन आणि भारताच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पण उभय देशांचे संबंध पुन्हा सुधारत आहेत. भारताच्या मोठ्या लोकसंख्येमुळे सरकारही हतबल होतं. पण आम्हाला अपेक्षा आहे, की मोदी पुन्हा जनमत मिळवतील आणि सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील. ज्यामुळे चीन-भारताचे आर्थिक सहकार्य आणि उभय देशांच्या संबंधांसाठी निरंतर प्रयत्न चालूच राहतील,” असं या वृत्तात म्हटलंय.
ग्लोबल टाइम्सचं वृत्त हे जगभरात चीन सरकारची भूमिका म्हणून जगात याकडे पाहिलं जातं. त्यामुळे या वृत्ताला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी त्यांची प्रतिमा कशी सुधारतील याबाबत या वृत्तात भाष्य करण्यात आलंय. यानंतर चीनची भारतात गुंतवणूक हेच समस्येचं निराकरण असल्याचंही म्हटलंय.
“भारत द्विधा मनस्थितीत असल्याचं सध्या दिसतंय. जर चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवलं, तर नोकऱ्या कमी होतील. चीनची गुंतवणूक ही मुळात मनुष्यबळ उपयोगी पडणाऱ्या कंपन्यांवर आधारित आहे, जसं की स्मार्टफोन मेकर कंपन्या. चीनच्या गुंतवणुकीला निमंत्रण देणं हे भारतासाठी फायदेशीर ठरु शकतं, ज्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळेल,” असं या वृत्तात पुढे म्हटलंय.
चीनच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याने भारतातल्या सरकारला फायदा होईल, असा सल्ला या वृत्तातून देण्यात आलाय. कारण, बेरोजगारी ही भारतातली सर्वात मोठी समस्या आहे आणि यातून बाहेर यायचं असेल तर चीनच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावंच लागेल, असंही म्हटलंय.
