शिवशाही बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर

शिवशाही बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर

मुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारांनाही प्रवासभाडे सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबतची घोषणा केली. शिवशाही बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्यात 70 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदाराला प्रवास भाड्यात 45 टक्के इतकी सवलत देण्यात येईल, असं ते म्हणाले.

एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी सुरु केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीला उतरली आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकाला सवलत देण्यात येत नव्हती. पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली. त्यामुळे दिव्यांगांनाही ही सवलत देण्यात येत असल्याचं रावते म्हणाले.

सध्या महामंडळामार्फत अंध आणि अपंगांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी 75 टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारांना साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी 50 टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आलाय. सध्या एसटी महामंडळाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे 2 लाख 82 हजार इतके लाभार्थी आहेत.

Published On - 8:19 pm, Wed, 6 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI