सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध लग्नाला नकार दिल्याने बलात्कार होत नाहीत : हायकोर्ट

| Updated on: Jul 26, 2019 | 10:11 PM

तक्रारदार तरुणी आरोपीसोबत प्रेमात होती आणि तिला सोबत राहण्याची इच्छा होती. सहमती काही तथ्यांच्या आधारावर होती, असं सांगून तक्रारदार आता तिच्या म्हणण्यावर माघार घेऊ शकत नाही, असं निरीक्षण कोर्टाने (Madhya Pradesh HC) निकालात नोंदवलंय.

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध लग्नाला नकार दिल्याने बलात्कार होत नाहीत : हायकोर्ट
Follow us on

भोपाळ : लग्न होणार नसल्याचं माहित असूनही तरुणीने शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराचा गुन्हा होत नाही, असा निर्वाळा देत मध्य प्रदेश हायकोर्टाने (Madhya Pradesh HC) बलात्काराचं प्रकरण फेटाळलं आहे. तक्रारदार तरुणी आरोपीसोबत प्रेमात होती आणि तिला सोबत राहण्याची इच्छा होती. सहमती काही तथ्यांच्या आधारावर होती, असं सांगून तक्रारदार आता तिच्या म्हणण्यावर माघार घेऊ शकत नाही, असं निरीक्षण कोर्टाने (Madhya Pradesh HC) निकालात नोंदवलंय.

लाईव्ह लॉ‘च्या वृत्तानुसार, सीआरपीसी कलम 164 अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या जबाबाचाही कोर्टाने आधार घेतला आणि लग्नाला नकार दिल्यानंतरही शारीरिक संबंध ठेवले का, याचा कोर्टाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचं हे प्रकरण नाही. तक्रारदार आरोपीच्या प्रेमात होती, ज्यामुळे संबंध ठेवण्यात आले, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

मध्य प्रदेश हायकोर्टाने या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचाही (डॉ. ध्रुवराज मुरलीधर सोनार विरुद्ध महाराष्ट्र राज्य) आधार घेतला. एखाद्या व्यक्तीने महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आकर्षित केलं असेल, पण त्यासाठी लग्नाचं आमिष दाखवलं नसेल तर तो बलात्कार होऊ शकत नाही, असं या निर्णयात म्हटलं होतं. मध्य प्रदेशातील प्रकरणातही हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेतला.

“सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाहीत”

अशा प्रकरणांमध्ये कोर्टाने अत्यंत सावधानतेने पडताळणी करायला हवी, की तरुण खरंच पीडितेसोबत लग्न करणार होता का? किंवा त्याने चुकीच्या हेतूने वासना पूर्ण करण्यासाठी लग्नाचं आमिष दिलं हे तपासायला हवं. वचन पूर्ण करणे आणि खोटं वचन पूर्ण न करण्यातही अंतर आहे. संबंधित पुरुषाने महिलेला आकर्षित करण्यासाठी एक ठराविक वचन दिलेलं नसेल, तर तो गुन्हा बलात्काराच्या समान नसेल, असं मत कोर्टाने नोंदवलं.

आरोपी पुरुषाने दिलेल्या खोट्या आश्वासनामुळेच नव्हे, तर फिर्यादी महिला तिच्या प्रेमापोटीही शारीरिक संबंध ठेवू शकते, किंवा लग्न करण्याची इच्छा असताना वचन दिल्यानंतरही काही परिस्थितींमध्ये ते वचन पूर्ण केलं गेलं नसेल, असाही प्रसंग येऊ शकतो. अशा प्रकरणांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायला हवं. पण पुरुषाने शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूनेच आश्वासन दिलं असेल तर हे बलात्काराचं प्रकरण होईल. महिला आणि पुरुष यांच्यातील सहमतीने झालेले शारीरिक संबंध कलम 376 अंतर्गत बलात्कार असू शकत नाहीत, असं कोर्टाने म्हटलंय.