शूज घेतल्यानंतर पिशवीचे पैसे आकारले, बाटाला 9 हजार रुपयांचा दंड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

चंदीगड : एखाद्या मॉल किंवा मोठ्या दुकानात जाऊन खरेदी केल्यानंतर पिशवीचे पैसेही ग्राहकांकडून आकारले जातात. अशाप्रकारे पिशवीचे पैसे आकारणाऱ्या बाटा या नामांकित ब्रॅंडला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे. एका ग्राहकाकडून पिशवीसाठी जास्तीचे 3 रुपये आकारल्यामुळे ग्राहक मंचाने बाटा ब्रँडला तब्बल 9 हजार रुपयांचा दंड ठोठावला. नेमकं प्रकरण काय? चंदीगडमधील सेक्टर 23 बी मध्ये राहणाऱ्या […]

शूज घेतल्यानंतर पिशवीचे पैसे आकारले, बाटाला 9 हजार रुपयांचा दंड
Follow us on

चंदीगड : एखाद्या मॉल किंवा मोठ्या दुकानात जाऊन खरेदी केल्यानंतर पिशवीचे पैसेही ग्राहकांकडून आकारले जातात. अशाप्रकारे पिशवीचे पैसे आकारणाऱ्या बाटा या नामांकित ब्रॅंडला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे. एका ग्राहकाकडून पिशवीसाठी जास्तीचे 3 रुपये आकारल्यामुळे ग्राहक मंचाने बाटा ब्रँडला तब्बल 9 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नेमकं प्रकरण काय?

चंदीगडमधील सेक्टर 23 बी मध्ये राहणाऱ्या दिनेश प्रसाद यांनी बाटा या फुटवेअर दुकानातून शूज खरेदी केले. त्यांनी खरेदी केलेले शूज 399 रुपयाला होते. मात्र बाटाच्या दुकानातून दिलेल्या बीलवर 402 रुपये किंमत दिली होती. या बिलावर 399 रुपये शूज आणि 3 रुपये कापडी पिशवीचे आकारण्यात आले होते. त्यानंतर दिनेश यांनी याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार केली.

दिनेश यांनी केलेल्या तक्रारीनुसार, नुकतंच बाटा या नामांकित फूटवेअर कंपनीच्या एका दुकानात खरेदी केल्यानंतर पिशवीसाठी माझ्याकडून तीन रुपये आकारण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी दिलेल्या पिशवीवर बाटा या ब्रँडचे नाव छापण्यात आले होते. याचाच अर्थ ग्राहकांकडून जादा पैसे आकारत मोठ-मोठे ब्रँड स्वत:चे प्रमोशन करत आहेत. असे दिनेश यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच कोणत्याही ग्राहकाने दुकानात खरेदी केल्यानंतर पिशवीसाठी पैसे आकारले जाणे चुकीचे आहे. त्या ग्राहकाला खरेदी केलेले सामान ठेवण्यासाठी मोफत पिशवी द्यायला हवी. असेही दिनेश यांनी ग्राहक मंचाला सांगितले आहे. तसेच दिनेश यांनी तीन रुपये परत करण्याची आणि झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर ग्राहक मंचाने दिनेश यांच्या तक्रारीची दखल घेत बाटा ब्रँडला चांगलाच दणका दिला आहे. या तक्रारीनंतर ग्राहक मंचाने बाटा इंडियाला आपल्या सर्व ग्राहकांना मोफत पेपर बॅग देण्याचा आदेश दिला आहे. तसेच वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे. त्यामुळे दुकानाने वस्तू विकत घेतल्यानंतर ग्राहकाला पिशवीचे पैसे आकारु नये असे सांगितले आहे.

तसेच ग्राहक मंचाने दिनेश यांच्या पिशवीचे पैसे रिफंड करण्याचा आणि याचिका दाखल करण्यासाठी एक हजार रुपये खर्च जमा करण्याचे आदेश दिले आहे. तसेच बाटामुळे दिनेशला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 3000 रुपये भरपाई द्यावी असेही आदेश दिले आहे. त्याशिवाय राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायदेशीर विभागाशी संबंधित खात्यात 5 हजार रुपये डिपॉझिट करण्यासही बाटा इंडियाला सांगण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे बाटा, बिग बाझार यांसारख्या विविध नामांकित ब्रँडला ग्राहकाने खरेदी केल्यानंतर पिशवी मोफत देणे भाग पडणार आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार असून नामांकित ब्रँडला मात्र चांगलाच दणका बसला आहे.