नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात

| Updated on: Oct 08, 2020 | 2:13 PM

लवकरच लोजपकडून ७० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात
Follow us on

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि संयुक्त जनता दलाकडून JD(U) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्यानंतर आता नितीश कुमार यांच्यासमोर नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. कारण, भाजप-जदयू यांच्यात युती झाल्यामुळे उमेदवारी कापली गेलेले भाजप नेते वेगाने लोक जनशक्ती पक्षात (लोजप) दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या १० बड्या नेत्यांनी लोजपमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये दोन विद्यमान आमदारांचा समावेश आहे. (Bihar Assembly Election 2020)

भाजप-जदयू यांच्यात युती झाल्यानंतर या दोन्ही आमदारांचे मतदारसंघ जदयूच्या वाट्याला आले. त्यामुळे या भाजप नेत्यांनी ‘लोजप’मध्ये प्रवेश करून नितीश कुमार यांच्याविरोधात शड्डू ठोकायचे ठरवले आहे.

नितीश कुमार यांचे नेतृत्त्व मान्य नसल्यामुळे ‘लोजप’चे अध्यक्ष चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडले होते. मात्र, पासवान यांनी केंद्रातील भाजपसोबतची युती कायम ठेवली आहे. ‘लोजप’कडून केवळ ‘जदयू’विरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार आहेत. लवकरच लोजपकडून ७० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पालीगंज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार उषा विद्यार्थी बुधवारीच लोजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, राजेंद्र सिंह आणि रामेश्वर चौरासिया यांनीही निवडणूक लढवण्यासाठी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. या तिन्ही नेत्यांना अनुक्रमे पालीगंज, दिनारा आणि सासाराम मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने या तिन्ही नेत्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिघांनीही पक्षाचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्या ‘जदयू’समोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर या तीन तारखांना मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या:

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची फौज सज्ज, शरद पवारांसह स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बिहारमध्येही महाविकास आघाडीसारखंच चित्र शक्य, कट्टर विरोधक एकत्र येणार?

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

दिग्विजय सिंहांच्या मुलीला भाजपचं तिकीट, बिहार निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

(Bihar Assembly Election 2020)