गोविंदबागेत दिवाळी साध्या पद्धतीने होणार, एकत्रित जल्लोषाला पवार कुटुंबाकडून कात्री

| Updated on: Nov 09, 2020 | 3:34 PM

यंदाच्या वर्षी शरद पवारांचं बारामतीतील निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत दिवाळी साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.

गोविंदबागेत दिवाळी साध्या पद्धतीने होणार, एकत्रित जल्लोषाला पवार कुटुंबाकडून कात्री
Follow us on

बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. (Diwali padwa Event of pawar Family Cancelled Due To Corona)

नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन पवार कुटुंबाने केलं आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असं विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतकांना करण्यात आले आहे.

शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असल्याचं पाहायला मिळतं. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामुहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचं दु:ख निश्चितच आहे, अशा भावना पवार कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करत समस्त पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल, बारामतीत ‘पुणेरी’ पाट्या!