राजेरजवाडे, अलिशान गाड्या, जमीन-जुमला, पण उदयनराजेंकडे मोबाईल कोणता?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

उदयनराजे भोसले… महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज इतकी ओळख खरंतर उदयनराजेंसाठी पुरेशी आहे. मात्र, त्यापलिकडे आपल्या दिलखुलास, मनमोकळ्या आणि दिलदार स्वभावाने साताऱ्यासह अवघ्या महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडील संपत्तीची नेहमीच चर्चा होते. जलमंदिर पॅलेससारखा राजवाडा ते मारुती जिप्सी, ऑडी, मर्सिडीज यांसारख्या अलिशान गाड्या, इतकेच नव्हे तर दैदिप्यमान वारसा […]

राजेरजवाडे, अलिशान गाड्या, जमीन-जुमला, पण उदयनराजेंकडे मोबाईल कोणता?
Follow us on

उदयनराजे भोसले… महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज इतकी ओळख खरंतर उदयनराजेंसाठी पुरेशी आहे. मात्र, त्यापलिकडे आपल्या दिलखुलास, मनमोकळ्या आणि दिलदार स्वभावाने साताऱ्यासह अवघ्या महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडील संपत्तीची नेहमीच चर्चा होते.

जलमंदिर पॅलेससारखा राजवाडा ते मारुती जिप्सी, ऑडी, मर्सिडीज यांसारख्या अलिशान गाड्या, इतकेच नव्हे तर दैदिप्यमान वारसा गाजवणाऱ्या घराण्याचा वारसाहक्काने आलेला जमीनजुमला, किलोंच्या पटीत सोनं-नाणं… असा उदयनराजेंचा राजेशाही थाट आणि तोही अगदी व्यक्तिमत्त्वाला आणि ‘छत्रपती’ घरण्याला शोभणारा. राजेंच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होते. मात्र, त्यांच्या संपत्तीइतकीच त्यांच्या साधेपणाची आणि मनमोकळ्या-दिलदार स्वभावाची चर्चा होते. याच स्वभावाला साजेसा असा त्यांचा मोबाईल फोन आहे.

आवाक् झालात?… धक्का बसला?… की आश्चर्यचकित झालात?

उदयनराजेंचा फोन? आणि तोही ‘साधा-सुधा’?

तुम्हाला खरं वाटत नसेल ना? पण हो, बोलण्यात, चालण्यात आणि आपल्या कर्तव्यात ‘स्मार्ट’ अससलेल्या उदयनराजेंचा फोन मात्र तुमच्या फोनइतका नक्कीच ‘स्मार्ट’ नाही.

मग कसा आहे? कोणता आहे? अशा प्रश्नांचा काहूर मनात दाटून आला असेल ना? थांब आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. शिवाय, आम्हाला ते कसं कळलं, हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

झालं असं की, आज म्हणजे आज दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले उदयनराजे भोसले ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’ या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी फिल्मी डायलॉगबाजी, आवडत्या गाण्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स, मुख्यमंत्री होणार का, असे थेट प्रश्न इथपासून उदयनराजेंना बोलतं करत, अगदी त्यांच्या सोशल मीडियातील वावरापर्यंत पोहोचलो आणि उदयनराजेंचा फोनच आमच्या नजरेस पडला.

बस्स… उदयनराजेंचा फोन पाहिल्यानंतर, आम्हीही आश्चर्यचकित झालो. मग तुमच्यापासून का लपवावं? म्हणून हा खटाटोप.

खासदार उदयनराजे भोसले ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’मध्ये आले होते. त्यावेळी त्यांना सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप इत्यादी गोष्टींबद्दल आम्ही प्रश्न विचारला. त्यावेळी उदयनराजेंनी थेट आपल्या खिशातून मोबोईलच काढला. उदयनराजेंचा मोबाईल कोणता, कोणत्या कंपनीचा, कोणतं मॉडेल हे सारं सांगण्याआधी उदयनरजेंनी कोणत्या प्रश्नावर मोबाईल दाखवला, हे आधी वाचा.

सोशल मीडियावर उदयनराजे फार अॅक्टिव्ह का नाहीत? असा प्रश्न ‘टीव्ही 9 मराठी’च्या अँकरने विचारला, त्यावर उदयनराजेंनी थेट खिशातून फोन काढत म्हटलं, “माझा हा फोन आहे. अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो, ऑन-ऑफ.. बस्स. पण एक आहे, तुमच्या स्मार्टफोनमुळे तुम्हाला खुप स्पर्धा निर्माण झाली आहे. आता नुसतं व्हॉट्सअॅप मॅन. कसलं व्हॉट्सअॅप नि कसलं काय. व्हॉट्सअॅपपेक्षा व्हॉट्स गो ऑनवर माझा जास्त विश्वास आहे. ग्राऊंड रिअॅलिटीवर चालणारा मी माणूस आहे. लोकांची जी नाळ आहे, ती मला माहित आहे. हे स्मार्टफोन वगैरे नव्हतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं. त्यामुळे स्मार्टफोन वगैरे गोष्टींमुळे जग चालतं अशातला भाग नाही.”

यावेळी उदयनरराजेंनी एक हटके उदाहरण दिलं आणि अख्ख्या न्यूजरुममध्ये हशा पिकला. उदयनराजे म्हणाले, आतापप्यंत मुली कथ्थक करायच्या, आता मुलंही स्क्रीनवर हात फिरवताना जणू कथ्थकच करतात.

असो… तर उदयनराजे वापरत असलेला हा फोन म्हणजे ‘नोकिया E52’

एकदम तोंडातच बोटं घातली असाल तुम्ही… पण खरंय. उदयनराजे अजूनही दहा वर्षांपूर्वी लॉन्च झालेला ‘नोकिया E52’ फोन वापरतात. या फोनची जरा आम्ही माहिती काढली. म्हटलं, पाहूया महाराष्ट्राच्या राजघराण्यातल्या व्यक्तीच्या खिशातील हा साधा-सुधा फोन नेमका काय आहे? तर आम्हाला मिळालेली माहितीही काहीशी रंजक आणि काहीशी धक्का देणारी ठरली.

‘नोकिया E52’ हा फोन जुलै 2009 मध्ये लॉन्च झाला. या फोनचे फीचर्स तुम्ही वाचाल, तर म्हणाल, राजेंकडे असा फोन?

GSM तंत्रज्ञान, 2.4 इंचाचा डिस्प्ले, 60 एमबी स्टोरेज, 3.2 मेगापिक्सेलचा कॅमेरा, LED फ्लॅश, 1500 mAh बॅटरी अशी आताच्या अपडेटेड स्मार्टफोनकडे पाहता, आधुनिक सुविधांचा अभाव असलेला जुन्या व्हर्जनचा फोन राजेंकडे आहे. विशेष म्हणजे, या फोनचं नोकियाने आता उत्पदानही बंद केलंय आणि पर्यायाने विक्रीही बंद झालीय. मात्र, राजेंनी अगदी जीवापाड या फोनला जपून ठेवलंय.

आतापर्यंत राजेंच्या राजवाड्यावर, गाड्यांवर, जमीन-जुमल्यावर प्रचंड चर्चा झाली असेल, अनेकांना आजही कुतुहल असेल, मात्र राजेंकडच्या फोनबद्दल आम्ही जे जाणून घेतलंय, ते नक्कीच तुम्हाला नव्याने कळलं असेल.

उदयनराजेंच्या दिलदार, मनमोकळ्या आणि ‘डाऊन टू अर्थ’ स्वभावाप्रमाणेच त्यांचा फोनही ‘साधा’ आहे. ते अपडेटेड नाहीत, अशातला भाग नाही. मात्र, त्यांनी या स्मार्टफोन वापराबाबत केलेले विधानही किती महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “कसलं व्हॉट्सअॅप नि कसलं काय. व्हॉट्सअॅपपेक्षा व्हॉट्स गो ऑनवर माझा जास्त विश्वास आहे. ग्राऊंड रिअॅलिटीवर चालणारा मी माणूस आहे. लोकांची जी नाळ आहे, ती मला माहित आहे. हे स्मार्टफोन वगैरे नव्हतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं. त्यामुळे स्मार्टफोन वगैरे गोष्टींमुळे जग चालतं अशातला भाग नाही.”

बस्स… राजेंचे हे उद्गार आपण सगळ्यांनाच नक्कीच विचार करायला भाग पाडणारे आहेत.

आणि हो… फोन जरी जुना असला, तरी नव्या पिढीला आधुनिकतेची कास धरायला लावणारे राजे निश्चितीच ‘स्मार्ट’ आहेत.

पाहा व्हिडीओ :