लग्नाच्या दोन दिवस आधी तरुणीचा गळफास, विरारमध्ये हुंडाबळी?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

पालघर: विरारमध्ये लग्नाच्या दोन दिवस आधी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सासरकडून अचानक 3 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याने या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. रुबिना मोहम्मद मोहसीन सिद्दीकी असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव आहे. रुबिनाचं 5 महिन्यांपूर्वी अंधेरी साकानाका येथील जुबेर हद्दीसुल्लाह शेख  या […]

लग्नाच्या दोन दिवस आधी तरुणीचा गळफास, विरारमध्ये हुंडाबळी?
Follow us on

पालघर: विरारमध्ये लग्नाच्या दोन दिवस आधी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सासरकडून अचानक 3 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याने या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. रुबिना मोहम्मद मोहसीन सिद्दीकी असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

रुबिनाचं 5 महिन्यांपूर्वी अंधेरी साकानाका येथील जुबेर हद्दीसुल्लाह शेख  या 26 वर्षीय तरुणासोबत लग्न ठरलं होतं. 19 जानेवारीला विरार इथे विवाह आणि 21 जानेवारी रोजी अंधेरीला रिसेप्शन कार्यक्रम प्रस्तावित होता. पण त्याआधीच सासरकडून 3 लाख रुपयांची मागणी झाली. पैसे न दिल्यास लग्नावर संकट येईल, असं सांगण्यात आल्याने, मानसिक दबावातून रुबिनाने घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोलणी झाल्याप्रमाणे रुबिना आणि जुबेरचं लग्न विरार इथे तर रिसेप्शन अंधेरीतील साकिनाका इथे करण्यात येणार होते.  रिसेप्शनचा खर्च दोन्हीकडील मंडळी अर्धा अर्धा करणार होते. रिसेप्शनचा खर्च किती येणार, जेवण काय, नातेवाईक किती, हे सर्व ठरवण्यासाठी मुलीचे नातेवाईक अंधेरीला 15 जानेवारी रोजी गेले होते. याठिकाणी त्यांची बोलणी झाली. पण नंतर त्याच रात्रीपासून मुलाच्या वडिलांनी तुम्ही आम्हाला पैसे कसे विचारले, तुम्ही आमची बेइज्जत केली, आता तुमचे पैसे आम्हाला नको, 3 लाख रुपये हुंडा द्या, असं फोनवरून मुलीच्या नातेवाईकांना तगादा लावल्याचा आरोप आहे. जर पैसे नाही दिले तर लग्नात आणि लग्नानंतर आम्ही तुमची बेइज्जत करु म्हणून धमक्याही  दिल्याचा आरोप मयत मुलीच्या नातरवाईकांनी केला आहे.

इतकंच नाही तर मुलीला फोन करूनही लग्न करणार नाही अशा धमक्या दिल्या. याच मानसिक दबावाखाली येऊन मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

मयत रुबिनाच्या विवाहाची तिच्या नातेवाईकांनी पूर्ण तयारी केली होती. आई-वडील लहानपणीच मयत झाल्याने तिची सर्वस्वी जबाबदारी भावाने स्वीकारली होती. पण आई वडिलांच्या नंतर आपल्या बहिणीला काही कमी पडू नये यासाठी त्याने तिला संसारात लागणाऱ्या सर्व वस्तूही घरात आणून ठेवल्या होत्या. फ्रीज, एसी, कपाट, बेड, तांब्या, वाटी, कप, कपडे हे सर्व काही आणलं होतं.  2 दिवसांवर लग्न आल्याने घरात आनंदी वातावरण होतं. सगळीकडे लगीन घाई होती. मात्र ज्या घरात लग्नसाहित्य ठेवलं होतं, त्याच घरात बहिणीने गळफास घेतला. सध्या अर्नाळा सागरी पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.