वरळीचा किंग कोण ठरणार? प्रभाग रचनेने दिग्गजांची झोप उडाली, बड्या नगरसेवकांचे फिल्डिंग सुरु
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचे युद्ध सुरू झाले आहे. आरक्षणामुळे माजी महापौरांसह अनेक दिग्गजांची जागा धोक्यात आली असून, पत्नी आणि मुलींच्या उमेदवारीसाठी नेत्यांची धडपड सुरू आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांची धामधुम सुरु झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा अभेद्य गड मानला जातो. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गडाला खिंडार पाडण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. त्यातच प्रभाग रचनेतील आरक्षण लॉटरीमुळे अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचे पत्ते कट झाले आहे. आता आपल्या कुटुंबातील वारसांना रिंगणात उतरवण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये मोठी चुरस रंगली आहे.
२०१७ च्या निवडणुकीत वरळीतील सर्व ६ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता समीकरणे बदलली आहेत. माजी नगरसेवक संतोष खरात आणि दत्ता नरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आपल्या बालेकिल्ल्यात आता मित्रपक्षांसोबतच अंतर्गत नाराजीचाही सामना करावा लागणार आहे. निष्ठावान माजी नगरसेवकांना सोबत ठेवण्यासाठी ठाकरे सेनेला सध्या मनधरणीच्या भूमिकेत राहावे लागत आहे.
प्रभागनिहाय चुरस – कोणाचे नशीब उजळणार?
१. प्रभाग १९३ (ओबीसी): हा प्रभाग सलग तिसऱ्यांदा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. येथे ठाकरे सेनेच्या माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर पुन्हा एकदा प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, शिंदे सेनेकडून उपविभाग प्रमुख निकिता घडशी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
२. प्रभाग १९६ (महिला राखीव): हा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांची अडचण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेंबूरकर आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे, वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील आपल्या पत्नी आकर्षिका पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. धक्कादायक म्हणजे याच प्रभागातून वरळीतील एक बडा नेता आपल्या मुलीला लाँच करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
३. प्रभाग १९८ (ओबीसी महिला): माजी महापौर स्नेहल आंबेकर यांचा हा प्रभाग आहे. मात्र, ओबीसी महिला आरक्षणामुळे त्यांचे गणित बिघडले आहे. येथे ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख गोपाळ खाडे हे आपल्या पत्नी आबोली खाडे यांच्यासाठी उमेदवारी मागत आहेत. तसेच, युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्यानेही आपल्या पत्नीसाठी या जागेवर दावा ठोकला आहे.
४. प्रभाग १९९ (महिला राखीव): येथे खरी लढत पाहायला मिळणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या वंदना गवळी, भाजपकडून आरती पुगांवकर आणि मनसेच्या संगीता दळवी यांनी शड्डू ठोकला आहे. एकाच प्रभागात इतक्या दिग्गजांची नावे चर्चेत असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोधकांचे मिशन वरळी
दरम्यान २०१७ मध्ये भाजप आणि मनसेला येथे खातेही उघडता आले नव्हते. मात्र, आता शिंदेंची शिवसेना अधिक जागा लढवण्यासाठी उत्सुक आहे. तर भाजपला येथे कमळ फुलवून आदित्य ठाकरेंना राजकीय धक्का द्यायचा आहे. राज ठाकरे यांची मनसे देखील या मतदारसंघातील मराठी मतांवर आपला दावा सांगत आहे.
