फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे

| Updated on: Nov 01, 2020 | 8:34 AM

रोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे
Follow us on

लंडन : कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील (Europe) देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 40 वाढ झाल्यामुळे 2 नोव्हेंबरपासून लाॉकडाऊनची (lockdown) कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या देशांपाठोपाठ आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (England faces new lockdown as UK Covid-19 cases crossed 10 lakhs)

यूकेमध्ये (UK) कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 मिलियन (10 लाख) होताच पीएम जॉनसन यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आता व्यापार (Business) आणि देनंदिन जीवनावर (Daily Life) कडक नियम लावण्यात आले आहेत. हा लॉकडाऊन गुरुवारी सुरु होईल आणि 2 डिसेंबरपर्यंत लागू असेल.

एका न्यूज कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान जॉनसन म्हणाले की, कोणताही जबाबदार पंतप्रधान कोरोनाच्या गंभीर आकडेवारीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. देशात कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन नाही झालं तर देशात दररोज हजारो लोक प्रमाण गमावतील. यापूर्वीच लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारो लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. त्यापैकी काहींची अवस्था गंभीर आहे. आपला देश अजून मृत्यू पाहू शकत नाही.

पीएम जॉन्सन म्हणाले की, इंग्लंडमधील नवीन लॉकडाउन नियमांनुसार आता बार आणि रेस्टॉरंट्समध्ये केवळ टेक-आउट सेवा उपलब्ध असेल. अनावश्यक दुकाने बंद राहतील, व्यायामासारख्या आणखी काही आवश्यक कामांसाठीच लोक घराबाहेर पडू शकतील. केस कापण्यापासून बाहेर फिरण्यापर्यंत अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, जर्मनीतील चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सार्वजनिक ठिकाणी 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. मनोरंजन क्षेत्रासंबंधी सर्व कामकाज बंद करण्यात आले आहे. चित्रपटगृह, ओपेरा, संगीत कार्यक्रमाची ठिकाणे, बार, रेस्टॉरंट्स नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत बंद राहणार आहेत.

फ्रान्सचे अध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन यांनीही देशात 1 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शुक्रवार (30) ऑक्टोबरपासून फ्रान्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान फ्रान्समध्ये फक्त अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय अडचण असल्यास बाहेर पडता येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काळजी घेतली गेली नाहीतर कोरोनामुळे मृत्यूंची संख्या 4 लाखांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अनेक देशांमध्ये वाढती रुग्णसंख्या

केवळ फ्रान्स, जर्मनी किंवा इंग्लंडमध्येच नव्हे तर, अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरु असल्याचं दिसत आहे. अमेरिका देशात सर्वाधिक 94 लाख 2 हजार 336 कोरोनाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 60 लाख 62 हजार 907 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 लाख 36 हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. भारतात आतापर्यंत 81 लाख 82 हजार 881 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1 लाख 22 हजार 120 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझील देशात 55 लाख 35 हजार 548 रुग्ण आढळले आहेत. तर रशियात आतापर्यंत 16 लाख 18  हजार 116 रुग्ण आढळले आहेत.

सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय, अनेक देश पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत

(England faces new lockdown as UK Covid-19 cases crossed 10 lakhs)