सर्पमित्राचा आगाऊपणा, नेल कटरने कोब्राचे दात काढले, व्हायरल व्हिडीओवरुन बेड्या

| Updated on: Mar 06, 2020 | 6:24 PM

नेल कटरने कोब्राच्या जबड्यातून दात काढल्याप्रकरणी वनविभागाने एका सर्पमित्राला अटक केली आहे.

सर्पमित्राचा आगाऊपणा, नेल कटरने कोब्राचे दात काढले, व्हायरल व्हिडीओवरुन बेड्या
Follow us on

नाशिक : नेल कटरने कोब्राच्या जबड्यातून दात काढल्याप्रकरणी वनविभागाने एका सर्पमित्राला अटक केली आहे (Removing of teeth of Cobra in Nashik). 2 मार्च रोजी निफाड तालुक्यातील उगाव येथे हा प्रकार घडला होता. त्यानंतर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओच्या आधारेच वनविभागाने आरोपी सर्पमित्रावर कारवाईची कुऱ्हाड उगारली आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेल कटरने कोब्राचे दात काढत असलेल्या एका सर्पमित्राचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर वन क्षेत्रपाल संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने व्हिडीओचा तपास सुरु केला. यात संबंधित व्हिडीओ निफाड तालुक्यातील उगाव येथील असल्याचं उघड झालं.

शिवाजी उर्फ नागराज श्रीपत साबळे या सर्पमित्राने उगावमधील नाना लोखंडे यांच्या घराजवळ कोब्रा पकडला. मात्र, तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने पकडलेल्या कोब्राला पुन्हा सुखरुप निसर्गात सोडून न देता नेल कटरच्या सहाय्याने त्याचे दात काढले. त्याचा हाच कोब्राचे दात काढतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. वनविभागाला याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. स्वतःची नागराज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आरोपी सर्पमित्र शिवाजी साबळेला अखेर येवला वनविभागाने बेड्या ठोकल्या. त्याच्यावर साप पकडण्यासाठी 500 रुपयांची मागणी केल्याचाही आरोप आहे.

आरोपीला येवला वनविभागाने बेड्या ठोकून निफाड न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची वन विभागाची कोठडी ठोठावली आहे.

Removing of teeth of Cobra in Nashik