शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये ‘या’ 4 मोठ्या घोषणा

शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये 'या' 4 मोठ्या घोषणा

Budget 2019 : केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट सादर केलं. या बजेटमधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा म्हणजे 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना महिन्याला 500 रुपये देण्याची घोषणा होय. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या या योजनेने या बजेटचं महत्त्वं वाढवलं. त्याचसोबत, गाय, मत्स्यपालन, पशुपालन, किमान आधारभूत किंमत याबाबतही महत्त्वाच्या घोषणा या बजेटमध्ये झाल्या.

घोषणा क्रमांक : एक

मोदी सरकारने अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी सरकारने 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातील. म्हणजेच, महिन्याला प्रत्येक शेतकऱ्याला 500 रुपये मिळतील. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल. 1 डिसेंबर 2018 पासून योजना लागू असेल. देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ होईल, असा दावा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडताना केला.

घोषणा क्रमांक : दोन

गोमातेसाठी आम्ही मागे हटणार नाही, असे म्हणत अर्थमंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय कामधेनु योजना आणि राष्ट्रीय गोकुल योजना सुरु केली. राष्ट्रीय गोकुल योजनेसाठी सरकारने 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

घोषणा क्रमांक : तीन

पशुपालन, मत्स्यपालन करणाऱ्यांना कर्जाबाबत दिलासा देण्यात आला आहे. हे व्यवसाय करणाऱ्यांना कर्जात 2 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. पशुपालन, मत्स्यपालन व्यवसायांना प्रोत्साहन मिळावं, असा सरकारचा यामागे उद्देश आहे.

घोषणा क्रमांक : चार

22 पिकांची किमान आधारभूत किंमत दीडपट करण्यात आली आहे. छोट्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा यामागे उद्देश असल्याचे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

बजेटमधील 6 महत्त्वाच्या घोषणा

Budget 2019 Live: बंपर बजेट! 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Published On - 1:24 pm, Fri, 1 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI