“महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर सहकारी बँक आणि कारखाने उघडा”

| Updated on: Dec 29, 2019 | 11:32 PM

महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर सहकारी बँका आणि साखर कारखाने उघडा, असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे (Governor Bhagat Singh Koshyari on Cooperative Sector).

महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर सहकारी बँक आणि कारखाने उघडा
Follow us on

ठाणे : महाराष्ट्रात राजकारण करायचं असेल तर सहकारी बँका आणि साखर कारखाने उघडा, असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे (Governor Bhagat Singh Koshyari on Cooperative Sector). त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ते कल्याणच्या के. सी. गांधी सभागृहात दि कल्याण जनता सहकारी बँकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या समाजसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी सगळीकडे अविश्वास आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे सहकार आणि सरकारपेक्षा संस्कार महत्त्वाचे असल्याचंही विधान केलं (Governor Bhagat Singh Koshyari on Cooperative Sector).

समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही सामाजिक दायित्वाची भावना सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असल्याचं मतही भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं. कोश्यारी म्हणाले, “सहकारात संस्कार महत्वाचे आहेत. या क्षेत्रात काम करताना विश्वासार्हता, सचोटी, त्याचबरोबर कामाप्रती निष्ठा असणं खूप गरजेचं आहे. या त्रिसूत्रीवर सामाजिक क्षेत्रात अनेक जण यशस्वी होतात. सहकार क्षेत्रात एक उत्कृष्ट मॉडेल म्हणून कल्याण जनता सहकारी बँक काम करत आहे.”

ग्राहकांना चांगली सुविधा देण्याबरोबरच या बँकेने सामाजिक वनीकरण क्षेत्रातही सहभाग घ्यावा. बँकेच्या सर्व खातेदारांनी एक रोप लावून सामाजिक बांधिलकी जोपासावी असंही आवाहन त्यांनी केलं.

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कृष्णलाल धवण, भास्कर शेट्टी, महेश अग्रवाल यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. 51 हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या पुरस्कारार्थींनी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम संचालक न्यासाकडे सुपूर्द केली.

यावेळी मंचावर खासदार कपिल पाटील, कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, न्यासाचे संचालक लक्ष्मीकांत उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,यांसह बँकेचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते.