प्रेयसीला पाकिस्तानात भेटायला गेलेला अन्सारी 6 वर्षांनी भारतात

नवी दिल्ली : प्रेयसीला पाकिस्तानात भेटायला गेलेला हमीद अन्सारी सहा वर्षांनी अखेर मायभूमीत परतला आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असलेल्या हमीद निहाल अन्सारीला मंगळवारी पाकिस्तानने भारताला सोपवले. वाघा-अटारी सिमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अन्सारीला भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले. यावेळी अन्सारीने भारतात पाउल ठेवताच देशाला नमन केले. अन्सारीवर भारतीय हेर असल्याचा आरोप पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांनी 2012 […]

प्रेयसीला पाकिस्तानात भेटायला गेलेला अन्सारी 6 वर्षांनी भारतात
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

नवी दिल्ली : प्रेयसीला पाकिस्तानात भेटायला गेलेला हमीद अन्सारी सहा वर्षांनी अखेर मायभूमीत परतला आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात गेल्या सहा वर्षांपासून बंदिस्त असलेल्या हमीद निहाल अन्सारीला मंगळवारी पाकिस्तानने भारताला सोपवले. वाघा-अटारी सिमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अन्सारीला भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले. यावेळी अन्सारीने भारतात पाउल ठेवताच देशाला नमन केले.

अन्सारीवर भारतीय हेर असल्याचा आरोप

पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांनी 2012 साली हामीद अन्सारी भारतीय हेर असल्याचे सांगत त्याला अटक केली होती. बनावट पाकिस्तानी ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपावरून 2015 मध्ये पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी सांगितले की, ‘अन्सारीला त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर सोडण्यात आले असून त्याला भारतात पाठवले जाईल. अन्सारी एक भारतीय हेर होता, याने अवैधरित्या पाकिस्तानात प्रवेश केला होता. तसेच तो राष्ट्र विरोधी गुन्हे आणि बनावट दस्तऐवज बनवण्यात सहभागी होता.’


अन्सारी हा मुंबईचा रहिवासी

33 वर्षीय हामीद अन्सारी हा मूळचा मुंबईचा आहे.15 डिसेंबर 2015 ला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला  पेशावरच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. 15 डिसेंबरला त्याची तीन वर्षांची शिक्षा पूर्ण झाली होती, मात्र कागदपत्र तयार नसल्याने त्याला भारताला सोपवण्यात उशीर झाला. त्यानंतर 17 डिसेंबरला त्याला भारतात परत पाठवण्याची तयारी पाकिस्तानने केली आणि आज अखेर तो मायदेशी परतला.

2012 साली अन्सारीला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि कोहाटच्या स्थानिक पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून अन्सारी बेपत्ता होता. त्यानंतर त्यांच्या आईने या प्रकरणी सरकारची मदत मागितली, तेव्हा अन्सारी हा पाकिस्तानच्या कैदेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला सोडवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

अन्सारी प्रेयसीला पाकिस्तानात भेटायला गेला होता

हमीद अन्सारी याची ऑनलाईन चॅटिंगवर एका पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याच प्रेयसीला भेटण्यासाठी अन्सारी अफगानिस्तान मार्गे पाकिस्तानात दाखल झाला. यानंतर त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि कोहाटच्या स्थानिक पोलिसांनी अटक केली होती.


अन्सारी परतल्याने भारत सरकारने आनंद व्यक्त केला

अन्सारी भारतात परतल्याचे समाधान भारत सरकारने व्यक्त केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी माध्यामांना सांगितले की, ‘आम्हाला पाकिस्तानकडून एक संदेश आला की, ते मंगळवारी भारतीय नागरीक हामीद अन्सारीची सुटका करणार आहेत. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.’

अन्सारी सारखे पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या आणि शिक्षा पूर्ण झालेल्या इतर भारतीय कैद्यांचीही लवकर सुटका करून त्यांना भारतात परत पाठवावे, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. तर हामीद अन्सारीच्या आईने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले. तसेच त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचेही आभार मानले आहेत.