जोरदार ये रे ये रे पावसा, सोलापूरकरांची आर्त हाक

| Updated on: Aug 05, 2019 | 7:19 PM

वरुण राजाने जिल्ह्यात काहीशी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही पिकांना जीवनदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी पिकांना जीवनदान देणारा पाऊस कधी येणार याच्याच  प्रतिक्षेत आहे.

जोरदार ये रे ये रे पावसा, सोलापूरकरांची आर्त हाक
Follow us on

सोलापूर : राज्याच्या अनेक भागात पावसामुळे हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे सोलापूरमध्ये अजूनही पावसाच्या दमदार आगमनाची प्रतिक्षा कायम आहे. आज (सोमवार) वरुण राजाने जिल्ह्यात काहीशी हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही पिकांना जीवनदान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी पिकांना जीवनदान देणारा पाऊस कधी येणार याच्याच  प्रतिक्षेत आहे.

दररोज हुलकावणी देणाऱ्या ढगामधून अखेर आज जिल्ह्यात पाऊस बरसला. मात्र, तोही केवळ शहराच्या हद्दीत काही मिनिटांसाठीच पडला. ग्रामीण भागात अगदी शिंतोड्याप्रमाणे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसला असला तरी पेरणीसाठी आणि पेरलेले उगवण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मनातील दुःख कायम आहे.

सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण जून आणि जुलै  महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी आज ना उद्या होईल या भरवशावर पेरणी केल्या, त्यांची पेरणी पावसाने दडी मारल्याने वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट ओढावले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 40 टक्के इतकाच पाऊस आहे. मात्र, गेल्या 2 दिवसात 6 ते 7 मिनिटे इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची आशा कायम असली, तरी त्यांची चिंता कायम आहे.

या सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे  जिल्ह्याची वरदायिनी असलेले  उजनी धरणं मात्र 73 टक्के भरलं आहे. त्यामुळे किमान उन्हाळ्यात सोलापूर शहरासह उजनी धरणावर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागणार आहे. मात्र, आजही जिल्यातील 150 हून अधिक गावांमध्ये 183 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 270 चारा छावण्यांमध्ये बळीराज्याचे पशुधन आश्रयाला आहे. त्यामुळे आमच्या शिवारात पुणे मुंबई सारखा पाऊस कधी पडणार असाच प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.