कऱ्हा-निरा नद्या दुथडी भरुन, बारामतीत रस्ते, घरं पाण्यात, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा फोन

| Updated on: Sep 26, 2019 | 12:00 PM

पुणे जिल्ह्यात (Pune heavy rains) झालेल्या पावसाने थैमान माजवलं. बुधवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे.

कऱ्हा-निरा नद्या दुथडी भरुन, बारामतीत रस्ते, घरं पाण्यात, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा फोन
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune heavy rains) झालेल्या पावसाने थैमान माजवलं. बुधवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे. तिकडे बारामती जिल्ह्यातर कऱ्हा आणि निरा या दोन्ही नद्यांना महापूर आल्यामुळे शेकडो कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाझरे धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा फोन

दरम्यान, बारामतीतही पावसाचा हाहाकार झाला आहे. बारामतीतील पावसाच्या थैमानाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. शेतीचं, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, जीवितहानीही झाली आहे, मात्र त्याची दाहकता अद्याप समोर आलं नाही, निरा आणि कऱ्हा दोन्ही नद्यांना पाणी आल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे, दुपारपर्यंत पाण्याचा निचरा होईल, त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, नागरिकांनी घाबरु नये”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

याशिवाय सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत, मुख्यमंत्र्यांनीही फोन करुन विचारपूस केली असं अजित पवारांनी सांगितलं.

“वरची धरणं भरली, त्यामुळे पाणी सोडण्यात आलं. आतापर्यंत इतका पाऊस झाला नव्हता. जलसंपदा विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. नाझरे धरणाचं पाणी बारामतीत येतं. ते अजून वाढणार आहे. पण संध्याकाळपर्यंत पाणी कमी होईल. इतकं पाणी कधीच आलं नव्हतं. सर्व यंत्रण महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत सर्वजण परिस्थिती हाताळत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही मला विचारलं, ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत. आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आहेत. भीतीचं कारण नाही, पण काळजी घ्यावी लागणार आहे” अजित पवार

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बारामतीत

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील बारामतीत दाखल झाले आहेत. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. आंबी बुद्रुक, मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, अंजनगाव, करावागज, डोर्लेवाडी, सोनगाव या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. जेजुरी – सासवड मार्गावरील पूल तुटल्यामुळे पुण्याहून जेजुरीकडे जाणारी वाहतूक थांबवली.

बारामतीकरांनो घाबरु नका – जिल्हाधिकारी 

नागरीकांनी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. पुण्यातील परिस्थिती पावसामुळे, तर बारामतीत नाझरे धरणातील पाणीसाठा वाढल्याने पूरस्थिती झाली आहे. सुरक्षिततेसाठी सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत. कोणतीही दुर्घटना किंवा जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली जातेय. पुढील एक दोन तासात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.