साताऱ्यात रात्रभर मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना पूर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत रात्रभरात सहा फुटांची वाढ

| Updated on: Oct 15, 2020 | 8:13 AM

सातारा येथील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्रीपासून वीर, उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. | Heavy Rain in Maharashtra

साताऱ्यात रात्रभर मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना पूर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत रात्रभरात सहा फुटांची वाढ
Follow us on

सातारा: सातारा जिल्हयात रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माण, खटाव, फलटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये नदी-नाले आणि तलाव भरुन वाहू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. मात्र, कालपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. परिणामी सातारा येथील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्रीपासून वीर, उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. (Heavy Rain in Maharashtra increase rivers water level)

वीर धरणातुन रात्री 23,185 क्युसेक,उरमोडी धरणातुन रात्री 1900 क्युसेक तर कण्हेर धरणातील दोन वक्रदरवाजातुन रात्री 1750 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच म्हसवड भागात माण नदीला पूर आला आहे. याठिकाणी नदीने धोकादायक पातळी ओलांडली असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे म्हसवड-आटपाडी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर माण-खटाव तालुक्यातही मुसळधार पावसामुळे बंधारे भरुन वाहू लागले आहेत. येत्या काही तासांत सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.

कोल्हापुरातही मुसळधार पाऊस; पंचगंगेच्या पातळीत मोठी वाढ
राज्याच्या इतर भागांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी रात्रभर तब्बल सहा फुटांनी वाढली. त्यामुळे सध्या पंचगंगा नदीने 17फुटांची पातळी गाठली आहे. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस असाच सुरु राहिल्यास पंचगंगेच्या काठावर असलेल्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सांगलीत 25 पूल पाण्याखाली, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 25 पूल पाण्याखाली गेले आहेत. तर तब्बल 18 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय, अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून मिरज पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान झाले आहे.

उस्मानाबादमध्ये पावासाचा हाहा:कार; पाझर तलाव फुटले
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहाकार समोर आला असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले. तर परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला. पुरात व पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बेडगा येथील 2 , गुंजोटी 3 , राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. उमरगा तालुक्यातील कदेर येथील अडकलेल्या दोन जणांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain LIVE | राज्यात दमदार पाऊस, उत्तर कोकणासह मुंबई ठाण्यात रेड अलर्ट

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

(Heavy Rain in Maharashtra increase rivers water level)