देशातील सर्वात उंच व्यक्तीची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी, उपचारासाठी 8 लाख मागितले

| Updated on: Aug 18, 2019 | 8:31 AM

भारतातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याकडे उपचारासाठी मदत मागितली आहे. धर्मेंद्र यांना हिप रिप्लेसमेंट सर्जरी करायची आहे.

देशातील सर्वात उंच व्यक्तीची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी, उपचारासाठी 8 लाख मागितले
Follow us on

लखनऊ (उत्तर प्रदेश) : भारतातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याकडे उपचारासाठी मदत मागितली आहे. धर्मेंद्र सिंह जरी उंचीने मोठे असले तरी त्यांना इतरांप्रमाणे सामान्य आयुष्य जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

धर्मेंद्र यांना हिप रिप्लेसमेंट सर्जरी करायची आहे. या सर्जरीमुळे त्यांना इतरांप्रमाणे सामान्य आयुष्य जगता येऊ शकते. त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. सर्जरीची रक्कम मोठी असल्यामुळे त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारही मला लवकरच मदत करणार असल्याचा दावा धर्मेंद्र यांनी केला.

8 फुट 1 इंच उंच असलेल्या धर्मेंद्रने सरकारकडे 8 लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी काल (17 ऑगस्ट) मुख्यमंत्री कार्यालयातही गेले होते. पण मुख्यमंत्री तेथे नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही.

धर्मेंद्र प्रताप सिंह यांच्या नावावर देशातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून त्यांची गिनीज आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. धर्मेंद्र हे जगातील सर्वात उंच असलेल्या माणासापेक्षा फक्त दोन इंचाने कमी आहेत.

“मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो. पण ते उपस्थित नव्हते. मी त्यांना मला मदत करण्यासाठी अर्ज लिहिला आहे. मला सर्जरी करायची आहे. त्यासाठी अंदाजे 8 लाख रुपये खर्च होणार आहे. मला मदतीचे आश्वासनही सरकारकडून दिलं आहे”, असं धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.