Indorikar Maharaj | मुला-मुलीच्या जन्माबाबत इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य, संगमनेर कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

| Updated on: Aug 07, 2020 | 2:54 PM

संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून आज कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

Indorikar Maharaj | मुला-मुलीच्या जन्माबाबत इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य, संगमनेर कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली
Follow us on

शिर्डी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु इंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या आदेशाला सेशन्स कोर्टात आव्हान देण्यात आले आहे, अशी माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली. संगमनेरच्या सेशन्स कोर्टात आता 20 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. (Indorikar Maharaj summoned to present in Sangamner Court)

निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज हे आपल्या खास विनोदी शैलीत कीर्तन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या ते न्यायालयीन फेऱ्यात अडकले आहेत. इंदोरीकर महाराजांवर आपल्या कीर्तनातून पुत्रप्राप्तीचे जाहीर वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. 26 जून रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना आज (7 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती

इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करुन या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

फेब्रुवारी महिन्यात हा वाद समोर आल्यानंतर वारकरी तसेच इंदोरीकर समर्थकांनी ‘अकोले बंद’ची हाक देत आंदोलन केले होते. कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजप अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इंदोरीकर यांची भेट देत समर्थन दिले होते. तर अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी देखील तहसिलदारांना निवेदन दिले होते.

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

(Indorikar Maharaj summoned to present in Sangamner Court)