जालन्यातील मुलीवर चुनाभट्टीत गँगरेप, दीड महिन्यांपासून मुंबई पोलिसांना नराधम सापडेना

| Updated on: Aug 29, 2019 | 3:29 PM

मुंबईत भावाकडे आलेल्या या तरुणीवर चार नराधमांनी 7 जुलैला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला होता. यानंतर या तरुणीला उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आलं.

जालन्यातील मुलीवर चुनाभट्टीत गँगरेप, दीड महिन्यांपासून मुंबई पोलिसांना नराधम सापडेना
Maharashtra Police Bharti 2019
Follow us on

औरंगाबाद :  जालन्यातील बलात्कार (Jalna Girl gang rape) पीडित तरुणीच्या मृत्यूनंतरही चार आरोपी नराधम अजूनही बेपत्ता आहेत. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) त्यांचा अद्याप शोध घेता आला नाही. 7 जुलैला मुंबईत झालेल्या (Jalna Girl gang rape)सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या जालन्यातील तरुणीने औरंगाबादमधील (GHATI) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान 28 ऑगस्टला रात्री तिचं निधन झालं.

जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पीडित कुटुंबाने घेतली.

मुंबईत भावाकडे आलेल्या या तरुणीवर चार नराधमांनी 7 जुलैला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला होता. यानंतर या तरुणीला उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आलं. मात्र पावणे दोन महिन्यांनंतर या मुलीला प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे आरोपी अजूनही मोकाट आहेत.

संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम

  • मुलीचा मृत्यू – 28 ऑगस्ट रात्री 9 वाजता
  • घटना घडली – 7 जुलै, रात्री 10 वाजता घरी आल्यानंतर कुटुंबाला प्रकार समजला
  • गुन्हा दाखल तारीख :- 29 जुलै, वडिलांच्या तक्रारीवरून दाखल – बेगमपुरा पोलीस ठाणे औरंगाबाद
  • दाखल गुन्हा, 30 तारखेला मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
  • सध्या तपास थंड गतीने सुरू आहे. अद्याप आरोपी पकडले नसल्याची पोलिसांची माहिती.
  • औरंगाबाद पोलिसांनी चुनाभट्टी पोलिसात गुन्हा वर्ग केल्यानंतर कुठलाही तपास केला नाही
  • मुंबई पोलिसांची आताची भूमिका ही फक्त आमचा तपास सुरू आहे. इतकीच प्रतिक्रिया मिळत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित तरुणी काही दिवसांपूर्वी भावाला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. पीडित मुलगी ही मूळची जालना जिल्ह्याची रहिवासी आहे. पीडित तरुणीचा भाऊ हा मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहत होता. भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती मुंबईत आली होती. 7 जुलैला भावाच्या मुलाला ताप आला म्हणून त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि गुंगीचं औषध देऊन चार जणांनी बलात्कार केला. या मुलीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला. अंमली पदार्थ आणि गुंगीचे औषध देऊन नराधमांनी पाशवी कृत्य केलं.

घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार घडल्यानंतर घरी काहीच सांगितलं नाही. वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. त्यानंतर घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी हा प्रकार अर्धांगवायूचा नसून वेगळं काहीतरी असल्याने तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलीला औरंगबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं. पण इथल्या डॉक्टरांनी तपासणी करून मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं.

त्यानंतर पीडितेने चार जणांनी काहीतरी पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हाच गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनाही अजून आरोपी शोधण्यात यश आलेलं नाही. मरणयातना भोगून या तरुणीने अखेर जगाचा निरोप घेतला. पण या चार नराधमांना शोधण्यात अजूनही पोलीस अपयशी ठरले आहेत.


संबंधित बातम्या 

मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या जालन्याच्या तरुणीचा अखेर मृत्यू