जालना सामुहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

जालना जिल्ह्यातील मुलीवर मुंबईत चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडित मुलगी सध्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात (घाटी) उपचार घेत आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.

जालना सामुहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील मुलीवर मुंबईत चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडित मुलगी सध्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात (घाटी) उपचार घेत आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. शुक्रवारी (2 ऑगस्ट) दुपारनंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिचा उपचार सुरु आहे. पीडित मुलीला गंभीर स्वरुपाचं इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे. मुलीला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस औरंगबादेत दाखल झाले आहे.

जालना जिल्ह्यातील एका मुलीवर मुंबईत चार जणांकडून सामूहिक बलात्कार (Jalna Girl rape) करण्यात आला आहे. याबाबत औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला भेटायला मुंबईत आलेल्या या मुलीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला. ही तरुणी मरणप्राय यातना भोगत आहे. चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झाला आहे. तिला सातत्याने वेडाचे झटके येत आहेत. ती शुद्धीवर आल्यानंतर जोरजोरात ओरडू लागते. अत्यंत अमानवी पद्धतीने अत्याचार या मुलीवर करण्यात आले आहेत.

पीडित मुलगी ही मूळची जालना जिल्ह्याची रहिवासी आहे. पीडित महिलेचा भाऊ हा मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहत होता. भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती मुंबईत आली होती. 7 जुलैला भावाच्या मुलाला ताप आला म्हणून त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि गुंगीचं औषध देऊन चार जणांनी बलात्कार केला.

घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार घडल्यानंतर घरी काहीच सांगितलं नाही. वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. त्यानंतर घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी हा प्रकार अर्धांगवायूचा नसून वेगळं काहीतरी असल्याने तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलीला औरंगबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं. पण इथल्या डॉक्टरांनी तपासणी करून मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने चार जणांनी काहीतरी पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हाच गुन्हा आता मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाच्या चौकशीसाठी औरंगाबादेत दाखल झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *