राष्ट्रवादीचा काँग्रेसला आणखी एक धक्का, काका कुडाळकर यांच्या हाती घड्याळ

| Updated on: Oct 24, 2020 | 4:49 PM

कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचा काँग्रेसला आणखी एक धक्का, काका कुडाळकर यांच्या हाती घड्याळ
Follow us on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसला धक्का दिलाय. कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Kaka Kudalkar join NCP) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. त्यानंतर आज काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघात काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली होती. स्वभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कुडाळकर यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता.

कुडाळकरांच्या माघारीने काँग्रेस पक्षावर नामुष्कीची वेळ आली होती. तेव्हापासून वर्षभर ते पक्षात अडगळीत होते. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. कोकणात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचं कुडाळकर यांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी कोकणात वजन असणाऱ्या कुडाळकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कुडाळकर हे नारायण राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. वर्षभर काँग्रेसमध्ये नाराज असलेले कुडाळकर आज अखेर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

काका कुडाळकर कोण आहेत?

-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आक्रमक आणि अभ्यासू नेता अशीही काका कुडाळकरांची ओळख आहे.

-मात्र, 2014 च्या निवडणुकीदरम्यान नितेश राणे यांच्याशी वाद झाल्याने, काका कुडाळकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी एकाच वेळी राणेंपासून फारकत घेतली होती. मात्र, आक्रमक काका कुडाळकर भाजपमध्ये रमले नाहीत.

-काँग्रेसचे अच्छे दिन पाहून काका कुडाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

-काका कुडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली होती

-आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

(Kaka Kudalkar join NCP)

संबंधित बातम्या

सिंधुदुर्गात भाजपला धक्का, काका कुडाळकर पुन्हा स्वगृही

तिकीट जाहीर केलेल्या काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार